पुणे, 14 जानेवारी : पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली, मात्र तिथे काहीही आढळून आले नाही. या धमकीच्या फोनमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलीस पथक नाशिकला रवाना घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोलिसांना फोनद्वारे देण्यात आली. या धमकीनंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच श्वान पथकाच्या मदतीने रेल्वे स्टेशन आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र तिथे पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आले नाही. हा कॉल मनमाडहून अज्ञात व्यक्तीने केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला रवाना झालं आहे.