पुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला
पुणे, 27 जून : विद्येचं माहेरघर असलेलं शहर आता गुन्हेगारांचं माहेरघर झालंय का? असा प्रश्न मागील काही दिवसांच्या घटनानंतर मनात येऊ शकतो. दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती एका तरुणामुळेच. एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला. काय आहे घटना? एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ही तरुणी जखमी झाली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला त्रास देत होता. अनेकदा त्याला समजावून देखील सांगण्यात आले होते. त्याच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची कल्पना देण्यात आली होती. मात्र, एवढं होऊन देखील आरोपीने मुलीला फोन करून धमकी दिली.
धमकी देण्यात आल्यानंतर पुन्हा मुलीच्या आईने या मुलाला समजावून सांगितलं. तिला तुझ्यासोबत फ्रेन्डशिप करण्याची इच्छा नाही तू जर तिला पुन्हा त्रास दिला तर मी पोलिसात तक्रार करेल असं मुलीच्या आईने आरोपीला बजावलं. याचाच राग आल्यानं आरोपीनं मुलीला रस्त्यात एकटं पाहून तिच्यावर कोयत्यानं वार केला. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. यावेळी एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत तरुणीचा जीव वाचवला. स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगेने आज धैर्य दाखवलं नसतं तर आज या तरुणीचा जीव गेला असता. कोण आहे लेशपाल जवळगे? लेशपाल जवळगे आणि त्याच्या मित्राच्या प्रसंगावधानामुळे आज एका तरुणीचा जीव वाचला. लेशपाल जवळगे हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं असून एक वर्ष नोकरी केली आणि आता तो 2018 पासून पुण्यात MPSC चा अभ्यास करत आहे. त्याचे आई-वडिल आढेगावात शेती करतात.
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली दखल लेशपालच्या या कामगिरीची राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील दखल घेतली आहे. फेसबुक पोस्ट लिहित लेशपालचे कौतुक केलं आहे. “आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पीडित मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे”, अशी पोस्ट लिहित लेशपालचं कौतुक केलं आहे.