एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेने तिला ड्रेस आणि सॅंडल विकत घेऊन दिली होती
लातूर, 02 मे : बीडमध्ये (beed) काही महिन्यांपूर्वी एका मुलीवर सामूहिक बलात्काराच्या (beed gang rape case) धक्कादायक घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता लातूरमध्येही (latur) एका अल्पवयीन मुलीसोबत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. फक्त 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला देहविक्री करायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या पीडितेवर अनेकांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 09 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात फक्त 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला चक्क देहविक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेने तिला ड्रेस आणि सॅंडल विकत घेऊन दिली होती. काही दिवसानंतर ‘ड्रेस आणि सॅंडलचे 500 रुपये दे नाहीतर आम्ही सांगेन ते कर’ असा दबाव त्या महिलांनी टाकला आणि इथून तिचा वाईट हेतूने वापर करून घेण्यात आला. ( भोंग्यावरुन नमाजपूर्वी अजान का दिली जाते? त्याचा काय अर्थ होते? ) धक्कादायक म्हणजे, एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंधाचे फोटो व्हिडीओ शूट करून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचं देखील उघड झालंय. याबाबतीत १५ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीनेच पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षकांना घडलेली आपबिती कथन केली. यानंतर तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 9 जणांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील सहा आरोपीना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा असल्यानं स्वतः पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी बारकाईनं लक्ष घातलं आहे. ( राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलिसांचा अहवाल तयार, गृहमंत्री घेणार उद्या निर्णय? ) लातूर शहर हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय नावाजलेलं शहर आहे. त्यामुळे अशा घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झालंय. या घटनेतील आरोपीना पोलिसांनी तात्काळ अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व पीडितेला न्याय द्यावा, तसंच आरोपींना कठोर शासन करावं अशी मागणी लातूरकरांनी केली आहे.