नवी दिल्ली 06 मे : एखाद्या गुन्ह्याचा (Crime) तपास करणं हे खूपच महत्त्वाचं आणि जिकिरीचं काम असतं कारण त्या तपासातील पुराव्यांच्या आधारेच न्यायालय (Court) गुन्हेगाराला दोषी ठरवून शिक्षा सुनावतं. पोलीस म्हटलं, की आपल्याला गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचणारे पोलीस डोळ्यांसमोर येतात. पण याच पोलिसांचा एक विभाग मात्र आणखी महत्त्वाची भूमिका बजावत असतो ती म्हणजे या पोलिसांनी जमा केलेल्या पुराव्यांचा अर्थ लावून घडलेला गुन्हा कुणी केला असावा हे निश्चित करण्याची. बरेचदा तपास अधिकारी पुरावे गोळा करून आणतात, घटनाक्रमही मांडतात पण त्यांना अनेकांवर संशय असतो. त्यापैकी नक्की कोणी गुन्हा केला हे शोधण्यात क्राइम ब्रँच अंतर्गत काम करणारे फिंगरप्रिंट एक्सपर्ट (Finger Print Expert) पोलीस मदत करतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे अशाच एका घटनेचं वृत्त टीव्ही-9 नं दिलं आहे. दिल्लीत 17 वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये एका उद्योजकाच्या खुनाचा सुगावा पोलिसांना (Delhi Police) कॉम्प्युटर मॉनिटरवर मिळालेल्या हाताच्या रक्तरंजित ठशामुळेच लागला होता. दिल्लीतील द्वारका पोलीस स्टेशनमध्ये 3 मे 2004 ला उद्योजक राजीव सोनी यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला. कुऱ्हाडीने राजीव यांचा खून झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या ठाण्यात एफआयआर नंबर 193/ 2004 (FIR No.) नोंदवला गेला आणि 302 कलमाअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या ठिकाणचा तपास केला पण काही महत्त्वाचा पुरावा त्यांना मिळाला नाही. आजुबाजूला राहणाऱ्यांनीही काही विशेष माहिती दिली नाही. त्यामुळे त्या स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा गुंता सोडवण्यासाठी त्यावेळी दिल्ली पोलीस क्राइम ब्रँचचे निर्देशक आर. के. वाजपेयी यांना पाचारण केलं. वाजपेयी आणि त्यांच्या खात्यातील सुप्रसिद्ध सब-इन्स्पेक्टर गंगाराम यांनी क्राइम सीनवर (Crime Scene) जाऊन पाहणी केली. या फॉरेन्सिक म्हणजेच फिंगर प्रिंट ब्युरोच्या पोलिसांनी घटनास्थळावरून पाच प्रकारच्या एकूण 21 फिंगर प्रिंट गोळा केल्या. त्यातच कॉम्प्युटर मॉनिटरवर उमटलेली हाताची रक्तरंजित प्रिंटही (Blood Print) होती. उद्योजक राजीव हा मॉनिटर नेहमी वापरत असत. आम्ही पाच प्रकारच्या एकूण 21 फिंगर प्रिंट (21 Finger Prints) गोळा केल्या होत्या असं त्या दिवशी फिंगर प्रिंट गोळा करणाऱ्या एका अधिकाऱ्याने टीव्ही 9 भारतवर्षला सांगितलं. वाजपेयी यांनी घटनास्थळावरून घेतलेल्या फिंगर प्रिंट पडताळणी करण्याची जबाबदारी तेव्हाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक चेतराम यांच्यावर सोपवली होती. चेतराम यांनी आपल्या हुशारीचा वापर केला आणि सगळ्या फिंगर प्रिंट पडताळून पाहिल्या. त्यांना 20 फिंगर प्रिंटमधून गुन्हा सिद्ध होण्यासारखी माहिती मिळाली नाही. पण अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. कॉम्प्युटर मॉनिटरवरून (Computer Monitor) मिळालेल्या हाताच्या रक्तरंजित प्रिंटचा उपयोग झाला आणि खुनी दीपक कुमार याच्या हाताच्या प्रिंटशी ती जुळली. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थितपणे या रक्तरंजित फिंगर प्रिंटच्या पुराव्याच्या सहाय्याने कोर्टासमोर (Court) मांडलं. त्याच पुराव्याच्या आधारे कोर्टाने दीपक कुमारला दोषी ठरवलं. अशा पोलीस तपासाच्या अनेक रंजक कथा असतात. निवृत्त पोलीस अधिकारीही असे अनुभव सांगतात. एका प्रिंटमुळे गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते हेच यातून दिसून येतं.