प्रतिकात्मक फोटो
लखनऊ 01 डिसेंबर : आपल्या देशाच्या संविधानात धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आला आहे. पण अजूनही काही ठिकाणी जातीभेद पाळला जातो. जातींसंदर्भात आजही काही लोकांचे विचार इतके कट्टर आहेत की, त्यासाठी खूनदेखील होतात. उत्तर प्रदेशात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षांच्या मुलीनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनीच तिचा खून केला आहे. आयुषी यादव असं या मुलीचं नाव असून, तिच्या 15 वर्षांच्या भावानं तिचा फोटो ओळखल्यामुळे या घटनेतील आरोपी उजेडात आले आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 19 नोव्हेंबर रोजी, पोलिसांना मथुरा येथील यमुना एक्सप्रेस वेच्या बाजूला एक लाल रोल-ऑन सूटकेस सापडली होती. या सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आयुषी यादवच्या ऑनर किलिंगची घटना प्रकाशात आली. पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, दृश्यम-२ स्टाइल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव कुटुंब दक्षिण दिल्लीत राहत होतं. सुमारे 25 वर्षांपूर्वी देवरियाहून स्थलांतरित झालेले नितेश यादव आणि ब्रिजबाला यादव नोएडामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबामध्ये आयुषी, तिचा भाऊ आयुष आणि आजी-आजोबा असे एकूण सहा जण राहत होते. मथुरा शहर विभागाचे पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषी अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. दोन वर्षांपूर्वी तिने वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा नीट (NEET) उत्तीर्ण केली होती. पण, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी तिनं जनकपुरीतील ‘पश्चिम दिल्ली महाविद्यालया’तून बीसीएचं शिक्षण घेणं सुरू केलं होतं. साधारण सहा वर्षांपासून आयुषीचे आणि मूळचा राजस्थानमधील भरतपूर येथील असलेल्या तरुणाचे प्रेमसंबंध होते. गुज्जर समाजातील हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्यामुळे आयुषीच्या पालकांचा दोघांच्या नात्याला विरोध होता. कुटुंबियांचा विरोध पत्करून ऑक्टोबर 2021 मध्ये दिल्लीतील आर्य समाज मंदिरात आयुषी आणि तिच्या प्रियकरानं गुपचूप लग्न केलं. विशेष म्हणजे विधीवत लग्न केल्यानंतर या वर्षी सप्टेंबर महिन्यात (2022) दोघांनी शाहदरा येथील न्यायालयात आपल्या लग्नाची कायदेशीर नोंदणीही केली होती. गुपचूप लग्न केल्यानंतर आयुषी आपल्या आई-वडिलांसोबतच राहत होती. ती आणि तिचा पती दोघंही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि नोकरी लागल्यानंतर एकत्र राहणार होते. मात्र, एक दिवस घरात वाद सुरू असताना आयुषीनं आपलं लग्न झाल्याचं उघड केलं. या कारणामुळे यादव कुटुंबात सतत वाद होत असत. 17 नोव्हेंबरच्या दुपारी असाच वाद सुरू असताना वडील नितेश यादव यांनी 32 बोअरचं परवाना असलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि आयुषीवर घराच्या पहिल्या मजल्यावरील तिच्या बेडरूममध्ये दोन गोळ्या झाडल्या, असं पोलीस अधीक्षक सिंह यांनी सांगितलं. मोनोपली गेम खेळताना वाद विकोपाला; सावत्र भाऊ-बहिणीच्या मागे पिस्तूल घेऊन धावला मुलगा; अन्… मथुरेतील महावन क्षेत्राचे मंडल अधिकारी (CO) आलोक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक गोळी तिच्या कपाळाच्या उजव्या बाजूला लागली होती तर दुसरी गोळी छातीच्या डाव्या बाजूला लागली होती. आयुषीचा खून केल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी एका प्लॅस्टिक कागदामध्ये मृतदेह गुंडाळला. गुंडाळलेला मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि घरातील इतर पुरावे नष्ट करण्यासाठी केमिकलनं घराची स्वच्छता केली. काही काळ मृतदेह असलेली सुटकेस बाथरूममध्ये लपवून ठेवली आणि रात्री तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीली देवरिया या मूळ गावी सुटकेस फेकण्याचा विचार त्यांनी केला होता. मात्र, दिवस उजाडू लागल्यानं मथुरा येथील यमुना एक्सप्रेस वेच्या बाजूलाच ती टाकून दिली. पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या फोटोच्या सहाय्यानं पोलिसांनी आयुषीच्या घरचा पत्ता मिळवला. तिथे गेल्यानंतर तिच्या पालकांनी दिलेली माहिती संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्यांना केंद्रस्थानी ठेवून तपास सुरू केला. पोलिसांनी 18 नोव्हेंबर या दिवसाचं यमुना एक्स्प्रेस वेवरील टोल प्लाझा आणि इतर ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या फुटेजमध्ये नितेश यादव आपल्या पत्नीसह गाडीमध्ये बसल्याचं स्पष्ट दिसलं. त्यानंतर, मुलीचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यादव दाम्पत्याला अटक करण्यात आली. नितेश यादवची कार, हत्येसाठी वापरलेलं परवाना असलेलं पिस्तूल, दोन रिकामी काडतुसं आणि आयुषीचा फोन पुरावा म्हणून जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतपूरमध्ये आयुषीच्या मृत्युनं व्यथित झालेला पती जीवाच्या भीतीनं जगत आहे. आयुषीप्रमाणे त्यानंदेखील कुटुंबियांपासून लग्न लपवून ठेवलं होतं. त्याच्या चुलत भावाच्या म्हणण्यानुसार, ‘त्यानं दुसऱ्या जातीत लग्न केल्याचं समजलं तर त्याचे वडिलसुद्धा त्याला ठार मारतील.’ “आम्ही प्रेम केलं हाच आमचा गुन्हा आहे. आयुषी आणि मला नोकरी मिळवून एकत्र सुखी आयुष्य जगायचं होतं. पण, जातीभेदामुळे आयुषीला आपला जीव गमवावा लागला तर मलाही ओळख आणि तोंड लपवून जगावं लागत आहे. माझ्या कुटुंबाला याबद्दल समजलं तर माझाही निश्चितपणे जीव जाईल. माझ्या जातीतील सर्व तरूण जातीभेदाचे बळी ठरत आहोत, " असं आयुषीचा पती फोनवर म्हणाला.