असा मॅसेज तुम्हाला आला असेल तर सावध व्हा
अविनाश पर्बत, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर सर्वात मोठे आयटी हब देखील याच पिंपरी चिंचवड शहराच्या हिंजवडी येथे वसलेले आहे. परंतु, सध्या याच आयटी कंपनीतील कामगारांना ऑनलाईन गंडा घालणारे टोळी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन टास्कच्या माध्यमातून गेल्या महिन्यात तब्बल 900 हून अधिक जणांना ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण? कोरोना काळात सर्व आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉर्म होम’ दिले होते. या दरम्यान घरी काम दिल्याने आपले काम लवकर पूर्ण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि उरलेल्या वेळेत अधिक पैसा मिळवू या उद्देशाने त्यांनी ऑनलाइन पार्ट टाइम जॉब पाहण्यास सुरुवात केली. यादरम्यान अनेकांचे नंबर, तसेच ईमेल आयडी, त्याच बरोबर आपले सोशल अकाउंट आयडी ऑनलाईन गेले. त्यानंतर अनेकांच्या मोबाईल नंबरवर त्याच बरोबर सोशल अकाऊंटवर अज्ञात क्रमांकावरुन काही लिंक तसेच मेसेज येऊन त्यांना ऑनलाईन पार्ट टाईम जॉबची ऑफर करण्यात येते. सुरुवातीला यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट नसल्याचं सांगण्यात येतं. नंतर त्यांच्याकडूनच पैसा घेऊन ऑनलाइन फ्रॉड करण्यात येतो. फक्त गेल्या महिनाभरात अशा 900 हून अधिक गुन्हे पिंपरी चिंचवडच्या सायबर सेलमध्ये दाखल झाले आहेत. वाचा - राहुलच्या शेवटच्या फोनने वाढवला सस्पेन्स, दर्शनाच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये ट्विस्ट गंडा घालणारे ही टोळी आधी समोरच्याला लालच देऊन आपल्या जाळ्यात ओढत असते. आपल्याला कोणतीही इंव्हेस्टमेंट करायची नसून ऑनलाईन टास्क पूर्ण करून आपल्याला पैसे कमवायची संधी असल्याचे सनगण्यात येते. त्यानंतर कधी व्हिडिओ पाहण्यासाठी सांगण्यात येते, कधी लाईक करण्यासाठी तर कधी शेअर करण्यासाठी सांगण्यात येते. असे वेगवेगळे टास्क देऊन सुरुवातीला समोरच्याच्या अकाउंटवर 50 ते 150 असा एक हजाराच्या आसपास रुपये जमा केले जातात. त्यानंतर त्यांना आमच्या मोठ्या प्लॅनमध्ये सहभागी झाले तर आपणाला लाखो रुपयांचे पेमेंट मिळेल असे आमिष दाखविण्यात येते. 900 लोकांना आर्थिक गंडा यामध्ये त्यांच्याकडून युपीआयच्या माध्यमातून विविध अकाउंटवर पैसे घेण्यात येतात. जोपर्यंत समोरील व्यक्ती पैसे देत आहे तोपर्यंत त्याच्या कडून पैसे घेतले जाते. जेव्हा समोरील व्यक्ती पेमेंटची विचारणा करतो त्यानंतर ही फ्रॉड मंडळी आपलं फेसबुक अकाउंट, टेलिग्राम अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट बंद करून संपर्क तोडतात. आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचे लक्षात येताच तो पोलीस ठाण्यात पोहचतो. अशा प्रकारे आतापर्यंत 900 हून अधिक जणांची बँक खाती या मंडळींनी रिकामी करत लाखो रुपये लुटले आहेत. पोलिसांनी अशा अनोळखी लिंकवर तसेच अनोळखी व्यक्तींसोबत संपर्क न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आपल्याला देखील असे जास्तीचे इन्कम कोणी देण्याचे आमिष दाखवले तर सावध राहा नाहीतर या फ्रॉड मंडळींना आपले खाते रिकामे करण्यास वेळ लागणार नाही.