गुल्लू खान
निखिल अग्रवाल, प्रतिनिधी मेरठ, 20 जुलै : उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ येथे एका मंदिरात घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एक मुस्लिम तरुण आपले नाव बदलून पुजारी बनला होता. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल 7 महिने या मंदिरात पुजारी म्हणून पूजा अर्चना केली. मात्र, लोकांना त्याच्यावर संशय आल्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गुल्लू खान असे या मुस्लिम तरुणाचे नाव आहे. तो गुल्लू बनून मंदिराचा पुजारी बनला. त्याचे खरे रुप समोर आल्यावर त्याला अटक करण्यात आली. पण एलआययू आणि इतर तपास यंत्रणा या घटनेप्रकरणी कसून तपास करत आहेत. ही घटना मेरठच्या मटौर येथील आहे. येथे एका शिवमंदिरात मागील 7 महिन्यांपासून एक तरुण पूजा अर्चना करत होता.
तो पुजारी आहे, असेच लोकांनी समजून घेतले होते. मात्र, गावातील काही लोकांना त्याच्या काही गोष्टींमुळे आणि त्याच्या दाढीमुळे त्याच्यावर संशय आला. यानंतर त्याची पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास केल्यावर संपूर्ण सत्य समोर आले. यानंतर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आरोपी गुड्डू खान याला पोलिसांनी अटक केली असून तुरुंगात टाकले आहे. या आरोपीनेही याआधीही काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे. नेमकं त्याने हे का केलं, त्याचा काय उद्देश्य होता, यासाठी पोलीस त्याची कसुन चौकशी करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.