सोलापूर, 26 ऑगस्ट : सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशमुख यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी श्रीकांत देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. सोलापूर सत्र न्यायालयाने 24 ऑगस्टला जामीन अर्ज फेटाळला होता. पण न्यायालयाने उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. अखेर आज देशमुखांना दिलासा मिळाला आहे. तक्रारदार महिला आणि श्रीकांत देशमुख हे एकमेकांशी अपरिचित नसल्याचं आणि ओळखीतून जवळीक वाढल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. दरम्यान, पीडितेने आरोप केल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. नेमकं प्रकरण काय? देशमुख यांच्यावर एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी देशमुख याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी श्रीकांत देशमुखनं सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आज जिल्हा न्यायालयात या अर्जावर न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयानं सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून देशमुख याचा अटकपुर्व जमीन फेटाळला. 5 प्रमुख मुद्द्यांवर जामीन फेटाळण्यात आला आहे. ( नोकरी मिळाली नाही तर आत्या म्हणाली वेश्या व्यवसायात चांगले पैसे मिळतील, पुण्यात तरुणीची सुटका ) जिल्हा सत्र न्यायालय काय म्हणालं होतं? जिल्हा सत्र न्यायालयात या प्ररकणी दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. त्यावेळी सरकारी वकिलांनी आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असून पळून जाण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी श्रीकांत देशमुख यांच्याकडे दोन दिवसाची संधी देण्यात आली होती. 26 तारखेपर्यंत जर उच्च न्यायालयाचे आदेश न आणल्यास आरोपीला अटक होण्याची शक्यता होती. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी ही माहिती दिली होती. तसेच देशमुख यांना येत्या 26 ऑगस्ट पर्यंत पोलिसांनी अटक करुन नये असे ही जिल्हा न्यायालयाने आदेशात नमूद केले होते. आता या प्रकरणी श्रीकांत देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.