अटक करण्यात आलेला आरोपी
पीयूष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 27 जून : अनेक जण लग्नानंतर बायकोसाठी तिला हव्या त्या सर्व गोष्टी आणून देऊ, असे म्हणतात. पण एका व्यक्तीने या सर्वांहून फारच वेगळा निघाला आहे. पत्नीला कुल्लू मनाली येथे फिरायला घेऊन जाण्यासाठी त्याने चक्क चोरी केली आहे. जानेवारीत लग्न झाल्यावर आपल्या पत्नीला हनीमूनला कुलू मनालीसारख्या हिल स्टेशनवर घेऊन जाईल, असे वचन त्याने दिले होते. पण त्याच्या पत्नीला हनीमूनसाठी मनालीला घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून बायकोला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तो चक्क चोर बनला. हाशिम असे या चोर नवऱ्याचे नाव आहे. पत्नीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हाशिमने आधी 3 जूनला ठाणे माझोला परिसरातून नवीन बुलेट मोटरसायकल चोरली आणि त्यानंतर 4 जून रोजी तो सागर सराय तेथे पोहोचला. इथे औषध विक्रेत्यांची डझनभर घाऊक दुकाने आहेत. हाशिमने एका मेडिकल एजन्सीवर तपासणी करुन तिथे येणाऱ्या मेडिकल रिप्रेझेंटेटिववर लक्ष ठेवायला सुरुवात केली.
यानंतर काही वेळातच हाशिम एका एमआरची एक लाख 90 हजार रुपये असलेली बॅग घेऊन फरार झाला. हा एमआर अमरोहा येथून आला होता. नसीर या एमआरचे नाव आहे. या घटनेने याठिकाणी एकच खळबळ उडाली. दोन दिवसांत बाईक आणि पैसे चोरल्यानंतर हाशिम आपल्या बायकोसोबत बुलेट मोटरसायकलवरून कुल्लू मनालीच्या ट्रीपला निघून गेला.
चोरीची माहिती पोलिसांनी बॅग चोरणाऱ्या तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्याने मास्क लावला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेपूर्वीचे जवळपास 50 हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा चोरी करणाऱ्या तरुणाचा खरा चेहरा पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा तपास केला असता तो हाशिम असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी खबरीच्या मदतीने हाशिमचा मोबाइल नंबर मिळवला आणि त्याच्यावर पाळत ठेवली. यादरम्यान, मुरादाबादच्या पोलिसांना हाशिमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे लोकेशन हिमाचल प्रदेशात सापडले. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. त्यामुळे पोलीस हाशिमचा मोबाईल फोन सुरू होण्याची किंवा मग तो मुरादाबादला परत येण्याची वाट पाहू लागले. अखेर हाशिम पत्नीसह मुरादाबादला परत आला. यावेळी पोलिसांनी हाशिमला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्याने बॅग चोरी तसेच माढोळा पोलीस ठाणे हद्दीतून बुलेट मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. हाशिमने पोलिसांना सांगितले की, त्याने लग्नानतंर आपल्या पत्नीला हनिमूनला एका सुंदर हिल स्टेशनवर नेण्याचे वचन दिले होते. जानेवारीमध्ये लग्न झाल्यापासून त्याची पत्नी त्याला वारंवार तिला घेऊन जाण्यास सांगत होती. मात्र, त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने आधी मझोला पोलीस ठाणे परिसरातून बुलेट मोटारसायकल चोरली. नंतर आणखी पैसे पाहिजे म्हणून मेडिकलवरुन एमआरची पैशांची बॅग चोरली. या बॅगेत 1 लाख 60 हजार रुपये होते. ही चोरी केल्यानंतर तो फरार झाला आणि आपल्या पत्नीला घेऊन बुलेटवरच कुल्लू मनालीला हनिमूनला गेला. पोलिसांनी त्याच्याकडून 45 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.