लखनऊ, 03 मार्च: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून (Lucknow, Uttar Pradesh) ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा काही बाइकस्वारांनी मोहनलालगंजचे भाजप खासदार (BJP MP) कौशल किशोर (Kaushal Kishore) यांच्या 30 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या. मडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या छटामील चौकात आयुषवर गोळी झाडण्यात आली. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आयुषच्या छातीत गोळी मारण्यात आली. आयुषवर फायरिंग करून बाइकस्वार फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आयुषला गंभीर परिस्थितीत ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता त्याची परिस्थिती स्थीर आहे. मुलावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच खासदार कौशल किशोर त्वरित ट्रामा सेंटर पोहोचले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
(हे वाचा- धक्कादायक! पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा तरुणाचा VIDEO VIRAL ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल. तसंच हा प्रकार कुणामुळे घडला, नेमका काय वाद होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. काल गाझीपूरमध्ये झालेल्या लुटमारीनंतर आज मडियावमध्ये भाजप खासदाराच्या मुलावर गोळीबार झाला आहे. या घटनांमुळे सामान्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. थेट खासदाराच्या मुलालाच गुंडानी लक्ष्य केल्यामुळे सामान्यांमध्ये खळबळ माजली आहे.