संपादित छायाचित्र
लातूर, 25 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये लग्नाला मुलगी मिळत नसल्याने अविवाहित तरुणांनी मोर्चा काढला होता. दुसरीकडे बहिणीची जमलेली सोयरीक मोडल्याच्या कारणातून एकाचा खून झाला तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काय आहे घटना? सविस्तर वृत्तानुसार, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी गावातील अखिल जलील बेलुरे याच्या बहिणीची सोयरीक जमली होती. मात्र, ही सोयरिक मोडल्याने अखिल जलील बेलुरे आणि त्याचा मित्र बबलू लायक भातांब्रे हे दोघेजण याचा जाब विचारण्यासाठी औराद शहाजनी येथील चौकात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बबलू महेताबसाब बागवान याच्याकडे गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बबलू बागवान याने खिशातला चाकुने अखिल व बबलू भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अखिल व भातांब्रे गंभीर जखमी झाले. यात अखिल बेलुरे या तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बबलू भातांब्रे हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. वाचा - मूर्तीचा रंग फिका पडल्याने आला सशय; औरंगाबादेत 2 किलो सोन्याची मूर्ती बदलल्याने खळबळ सोलापुरात लग्न जमेना म्हणून मोर्चा सोलापूर जिल्ह्यात गर्भ लिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी न झाल्याने सोलापूरच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. लग्नाचं वय निघून चाललं आहे, वधू पक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कायम रोजगार नाही, सरकारी नोकरी नाही, मुलगा शेतीच करतो, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आमची लग्नाची वयं उलटून चालली आहेत. आम्हाला एखादी बायको द्या, अशी प्रमुख मागणी करत क्रांती ज्योती परिषदे मार्फत मोर्चा काढला होता. इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांची मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे, आम्हाला मुलगी द्या, अन्यथा मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा अशा विविध मागण्या करत, माथ्यावर मुंडावळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता, शिक्षण झालंय, शेती करतो, लग्नाचं वय झालं तरी ही मुलगी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली.