इंदापूर, 9 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीत आढळलेल्या सात मृतदेहांची घटना ताजी असतानाच आणखी एक मृतदेह आढळला आहे. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला आहे. या युवकाच्या शरिराचे पाच तुकडे करत शीर विरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आला आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच भिगवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या गूढ आणि तेवढ्याच रहस्यमय क्रुर खूनाचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मागच्याच महिन्यात भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातल्या 7 जणांचे मृतदेह सापडले होते. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांच्या मुलासोबत चुलत भावाचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण ही बाब मोहन पवार यांनी त्याला सांगितल नाही. 4 दिवसांनी मुलाच्या अपघाताची बातमी मारेकरी चुलत भावाला मिळाली. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून मोहन पवार यांच्यासह कुटुंबीयांची हत्या केली आणि मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिली.