प्रातिनिधीक फोटो
जळगाव, 28 फेब्रुवारी: जळगाव (Jalgaon) शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय (suspicion of immoral relationship) घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पीडित विवाहिता पतीकडून होणाऱ्या छळाची (Persecution) माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे. बालविवाह केल्याच्या कारणातून पोलिसांनी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित मुलीच्या आईसह मावशी, मामा, सासू आणि सासऱ्यांवरही वेगळा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शनी पेठ पोलीस करत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही अल्पवयीन आहे. जून 2021 मध्ये पीडित मुलीची आई, मामा आणि इतर नातेवाईकांनी आपसातील सहमतीनं अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला होता. पीडित मुलीचा जळगाव शहरातील एका तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला होता. लग्नानंतर पीडित मुलगी नांदायला जळगावला तरुणाच्या घरी गेली होती. पण लग्नानंतर आठ महिन्यातच आरोपीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायला सुरुवात केली. हेही वाचा- मिटींगसाठी बोलावून केला विश्वासघात; नराधमाने महिला वकिलाला गुंगीचं औषध दिलं अन् आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं अचानक 8 फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेली. ती थेट जळगावहून आपल्या आजीकडे इंदूर याठिकाणी गेली. पण इंदूर शहरात आजी कुठे राहते? याची माहिती पीडितेला नव्हती. त्यामुळे तिनं संपूर्ण रात्री रेल्वेस्टेशनवर घालवली. दुसऱ्या दिवशी तिने आजीचं घर शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली. पण पीडित मुलीची अधिक विचारपूस केल्यानंतर तिने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पीडित मुलीला स्थानिक बाल कल्याण समितीकडे पाठवलं. हेही वाचा- बायकोनं घटस्फोट देताच गायब झाला तरुण; जंगलात धक्कादायक स्थितीत आढळला मृतदेह याठिकाणी सविस्तर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला जळगावातील बालकल्याण समितीकडे पाठवलं. तिथेही चौकशी आणि जबाब नोंदवून घेण्यात आले. यावरून पोलिसांनी आरोपी पतीसह त्याचे मामा, पीडित मुलीची आई, मामा, चुलत मावशी, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यावरून आरोपी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास शनी पेठ पोलीस करत आहेत.