मुंबई, 3 जानेवारी : अलीकडच्या काळात फोनचा वापर खूप वाढलाय. अगदी शिक्षणापासून, शॉपिंग ते बिल भरण्यापर्यंत सगळी कामं फोनवरून होतात. त्यामुळे फोनला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. सध्याच्या काळात मोबाईल फोन हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घरातील मुलांचा अभ्यास फोनवरून होतो, तर अनेक जण टीव्ही आणि मनोरंजनासाठी फोनचा वापर करतात. आपली बँकेची कामंही ऑनलाइन होतात. फोनवर एका क्लिकवर अनेक सोई-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. घरातील वृद्ध व्यक्तीही योगासनं आणि आध्यात्मिक गोष्टी पाहण्यासाठी मोबाईल वापरू लागले आहेत. पण या मोबाईलचे जसे फायदे आहेत, तसेच नुकसानही आहेत. काही जण आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. अनेक जणांना मोबाईलची खूप सवय लागते आणि त्याचे परिणाम कामावर तसेच नात्यावरही दिसून येतात. अशीच एक घटना सध्या उघडकीस आली आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय. काय आहे प्रकरण? झारखंडमधील पलामू जिल्ह्यात एका महिलेने मोबाईल फोनमुळे स्वत:च्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील रेहला पोलीस स्टेशन हद्दीतील सिगसिगी पंचायत परिसरातील झुरहिटोला येथील रहिवासी पिंटू चौधरी याची पत्नी चिंतादेवी विनय हिने आत्महत्या केली. पतीने मोबाईल फोन तोडल्याचा राग मनात तिने धरून स्वत:चं आयुष्य संपवलं. पती अघोरी तर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे एकमेकांवर गंभीर आरोप मृत चिंतादेवी मोबाईलमध्ये जास्तच वेळ घालवायची, त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून पती पिंटू चौधरी याने चिंतादेवी यांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झालं होतं. यादरम्यान रागाच्या भरात पिंटू चौधरीने पत्नीचा फोन जमिनीवर आपटून तोडला. पतीने मोबाईल फोन अशा प्रकारे तोडल्याने नाराज झालेल्या चिंतादेवीने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं आणि स्वत:च्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच रेहला पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी मेदिनीनगर येथील मेदनी राय मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला. मोबाईल फोनवरून पती-पत्नींमध्ये वाद झाला होता. पती पिंटू चौधरी याने पत्नी चिंतादेवीचा मोबाईल हिसकावून तोडला, त्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केली, असं रेहला पोलीस स्टेशनचे प्रभारी धारी रजक यांनी सांगितलं.
या घटनेबाबत पोलिसांनी पतीसह घरात उपस्थित असलेल्या इतर लोकांची चौकशी केली. महिलेने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. केवळ मोबाईलमुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रकरण चर्चेत आहे.