मंडला, 17 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) मंडला येथून एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका अज्ञात हल्लेखोरांनी संपूर्ण कुटुंबाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. नराधमांनी आदिवासी पती-पत्नी आणि मुलीची झोपेतच हत्या केली. इतकच नाही तर त्या नराधमांनी महिलेचं डोकं कापून आपल्यासोबत घेऊन गेले. डोकं कापलेलं धड रक्ताच्या थारोळ्यात गच्चीवरच पडून राहीलं. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. नराधमांनी चिमुरडीलाही नाही सोडलं… अंगावर काटा उभा राहणारी ही घटना मंडला जिल्ह्यातील मोहगाव भागातील पातादेई गावातील आहे. येथे मंगळवारी रात्री संपूर्ण कुटुंब आपल्या घराच्या गच्चीवर झोपायला गेला होता. साधारण तीन ते चार वाजेदरम्यान काही हल्लेखोरांनी पती-पत्नी आणि मुलीची हत्या केली. मृतांमध्ये नर्मद सिंह (62 वर्ष), पत्नी सुकरती बाई (57 वर्ष) आणि महिमा (12 वर्षे) यांचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट करीत शिवराज सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. दिग्विजय सिंह म्हणाले की, मध्य प्रदेशात गुन्हेगारी वाढत आहे. राज्यात SC आणि ST कुटुंबावर अत्याचार केले जात आहेत. अशावेळी राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. गावात मोठ्या संख्येने पोलीस तैनात... मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस दल गावात पोहोचले आहेत. तीन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या कुटुंबाची हत्या करण्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणात शोध घेत आहेत.