'अंडकोश दाबणे म्हणजे हत्येचा प्रयत्न नाही'
बंगलोर, 27 जून : 13 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणात गुप्तांगाला दुखापत झाल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची शिक्षा कर्नाटक हायकोर्टाने कमी केली आहे. भांडणाच्या वेळी दुसऱ्या व्यक्तीचे अंडकोष किंवा गुप्तांग दाबणे याला ‘हत्येचा प्रयत्न’ म्हणता येणार नाही, असे कर्नाटक हाय कोर्टाने म्हटले आहे. हाय कोर्टाचा हा निर्णय ट्रायल कोर्टाच्या आदेशापेक्षा वेगळा आहे. गंभीर दुखापत केल्याबद्दल 38 वर्षीय आरोपीला दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. हायकोर्टाने दोषीची शिक्षा 7 वर्षांच्या तुरुंगवासावरून 3 वर्षांपर्यंत कमी केली आहे. काय आहे प्रकरण? कर्नाटक हायकोर्टात पोहचलेलं हे प्रकरण 2010 चे आहे. 2012 मध्ये ट्रायल कोर्टाने परमेश्वरप्पा यांना यात दोषी ठरवले होते. त्यावर सुनावणी केल्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने सांगितले की, ‘आरोपी आणि तक्रारदार यांच्यात घटनास्थळी मारामारी झाली. त्या भांडणाच्या वेळी आरोपीने फिर्यादीचा अंडकोषाला दाबला, त्यामुळे आरोपीने ते हत्या करण्याच्या उद्देशाने केले असावे, असे म्हणता येणार नाही. जर आरोपीने हत्येची तयारी केली असती किंवा खुनाचा प्रयत्न केला असता, तर त्यासाठी तो सोबत काही घातक शस्त्रही आणू शकला असता.’ हायकोर्टाचा युक्तिवाद न्यायमूर्ती के. नटराजन यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की, ‘आरोपींनी शरीराचा महत्त्वाचा भाग ‘अंडकोष’ पकडला, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या घटनेनंतर, जखमीला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अंडकोष काढण्यात आला. जी एक गंभीर जखम आहे. त्यामुळे माझ्या मते आरोपीने हत्येचा प्रयत्न दुर्बुद्धीने किंवा तयारीने केला असे म्हणता येणार नाही. पीडित व्यक्तीला झालेली दुखापत भारतीय दंड संहितेच्या कलम 324 अन्वये गुन्हा ठरतो, जी शरीराच्या महत्त्वाच्या ‘खाजगी भागाला’ दुखापत करण्याशी संबंधित आहे. वाचा - पुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला; तरुणाने जीवावर उदार होत वाचवला जीव? कोण आहे तो? काय होती संपूर्ण घटना? 2010 मध्ये पीडित ओंकारप्पाने याबद्दल फिर्याद दिली होती. गावातील जत्रेत ‘नरसिंहस्वामी’च्या मिरवणुकीसमोर ते आणि इतर लोक नाचत होते, त्यावेळी आरोपी परमेश्वरप्पा हा मोटारसायकलवरून तेथे आला आणि भांडण करू लागला. त्यानंतर झालेल्या भाडणात परमेश्वरप्पाने ओंकारप्पाचे अंडकोष पकडले. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. पोलीस चौकशी व खटल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. चिक्कमगालुरू जिल्ह्यातील मुगलिकट्टे गावातील रहिवासी असलेल्या परमेश्वरप्पा याने चिक्कमगलुरू येथील ट्रायल कोर्टाच्या शिक्षेला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली.