रायपूर 07 मे : भितींवरुन उड्या मारुन पाच कैदी (Prison) फरार झाल्याची एक घटना समोर आली आहे. यातील एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही घटना छत्तीसगडच्या (Chhattisgarh) महासुंद (Mahasamund) जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं, की महासमुंदमधील तुरुंगात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असलेले पाच आरोपी फरार झाले. रात्री उशिरा यातील एका कैद्याला पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणानंतर काही कैदी बाहेरच्या बाजूला काम करत होते, यातच फरार झालेले कैदीही सामील होते. पोलिसांनी सांगितलं, की काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी जेल अधिकाऱ्यांना हे कैदी फरार झाल्याची माहिती दिली. यानंतर फरार झालेल्या कैद्यांचा तपास सुरू केला गेला. पोलिसांनी सांगितलं, की फरार झालेल्यांमधील धनसाय, डमरूधर आणि राहुल हे चोरीप्रकरणी 2019 पासून तुरुंगात बंद होते. राहुल उत्तर प्रदेशच्या गाजीपुरमधील तर इतर दोघे महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होते. इतर दोघांमधील दौलत हा चुकीच्या कृत्यामुळे तर करण नशेचा पदार्थ जवळ ठेवल्यामुळे शिक्षा भोगत होते.
अधिकाऱ्यांनी सांगितलं, की कैदी फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, हे कैदी 21 फूट उंच भींतीवरुन उडी मारुन गेल्याचं समोर आलं. पोलिसांनी सांगितलं, की घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून फरार कैद्यांचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की पोलिसांनी यातील एक फरार कैदी डमरूधर याला बेमचा गावाजवळून अटक केली आहे. इतर चौघांचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की फरार कैद्यांमधील चौघांना 2019 मध्ये शिक्षा सुनावल्यानंतर जेलमध्ये आणण्यात आलं होतं. तर, एकाला 2020 मध्ये सुनावणीनंतर जेलमध्ये आणण्यात आलं.