जुळ्या मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेऊन फरार झाला बाप, जन्म दिल्यानंतर आईचा झाला होता मृत्यू
नालंदा, ३० मे : बिहार सरकार सोबत मिळून सामाजिक संस्थांनी कितीही वेळा प्रयत्न केले तरी त्यांची मानसिकता बदलणार नाही. त्यांच्या नजरेत मुलगा आणि मुलगी यांच्यात खूप फरक आहे. याचे उदाहरण नालंदामध्ये पाहायला मिळाले. येथे एका बापाने आपल्या नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून पळ काढला. या घटनेला 12 दिवस होत आहेत, मात्र आजतागायत कोणीही त्यांना पाहायला आलेले नाही. दोन्ही नवजात बालकांवर रुग्णालयातील कर्मचारी आणि एनआयसीयू वॉर्डमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दोन्ही बाळे निरोगी असल्याचे सांगण्यात येते. 18 मे रोजी संध्याकाळी चांडी पोलीस स्टेशन हद्दीतील महानंदपूर गावातून गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेद्वारे बिहार शरीफ सदर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यादरम्यान गर्भवती महिलेला गाडीतच प्रसूती वेदना होऊ लागल्या. रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचताच महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. यानंतर गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला उपचारासाठी अतिदक्षता विभागात नेण्यात आले परंतु तिचा मृत्यू झाला. मृत रीना देवीचा पती हरेंद्र पासवान याने पत्नीच्या मृत्यूनंतर मुलींना रुग्णालयात सोडून पळ काढला. जुळ्या मुलींची काळजी घेणाऱ्या सफाई कर्मचारी शीला देवी म्हणाल्या की, या मुलींचे कोणीही नातेवाईक अजून त्यांना भेटायला आले नाहीत. त्यांना फोन करून पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊनही मुलींचे वडील त्यांना घेऊन जाण्यासाठी आले नाहीत. तसेच दोन्ही मुलींवर उपचार करत असलेले डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, “जन्मांनंतर एका मुलीची अवस्था गंभीर होती, मात्र वेळेत उपचार मिळाल्याने दोन्ही मुली आता निरोगी आहेत. दोघींचे वजन 800-800 ग्रॅम आहे. मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन जावे अशी विनंती डॉक्टरांनी केली.