अंजलीसिंगच्या शरीरावर होत्या 40 जखमा, मेंदू अन् छातीच्या हाडांवर नव्हतं मांस, पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून खुलासा
दिल्ली, 04 जानेवारी : दिल्लीतील कंझावाला भागात झालेल्या अपघातात एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर कारचालकाने तिला 12 किलोमीटर फरफटत नेलं होतं. अंजलीसिंग असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. आता तिचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट समोर आला आहे. त्यात तिच्या शरीरावर एकूण 40 जखमा होत्या, असं डॉक्टरांनी म्हटलंय.
अंजलीच्या मेंदूतील अनेक भाग गायब होते, तिची कवटी उघडी पडली होती आणि मणके फ्रॅक्चर झाले होते, असा उल्लेख तिच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. तसंच मृतदेहावर भयानक आणि गंभीर जखमा असल्याचं म्हटलं गेलंय.
हे ही वाचा : धनंजय मुंडेंच्या कारला मोठा अपघात, एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवणार; अपघातग्रस्त कारचा धक्कादायक Video
दिल्लीत 1 जानेवारीच्या पहाटे झालेल्या अपघातात तिच्या स्कूटीला कारने धडक दिली होती. यात कारखाली अडकलेल्या अंजलीला चालकाने दूरपर्यंत फरफटत नेल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (MAMC) येथील डॉक्टरांच्या टीमने तिचं पोस्ट मॉर्टेम केलं. अंजलीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्याची माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली.
अंजलीच्या मेंदूचा काही भाग सापडलाच नव्हता, तसंच तिच्या छातीच्या फासळ्या मागच्या बाजूने उघड्या पडल्या होत्या आणि फरफटत नेल्याने छातीवरील हाडं उघडी पडली होती, असं डॉक्टरांनी दिल्ली पोलिसांना सांगितलं. अंजलीच्या मणक्यामध्ये लंबर भागात फ्रॅक्चर झालं होतं आणि तिचं शरीर धूळ आणि घाणीने माखलं होतं, असंही डॉक्टर म्हणाले.
“अंजलीचं पोस्टमॉर्टेम करताना असं दिसून आलं की तिची कवटी धूळ आणि चिखलाने माखली होती. ती उघडी पडली होती आणि आतील सर्व भाग गायब होता. तिच्या हाडांचे फ्रॅक्टर झाले होते. तिची कवटी आणि पायांची हाडंही फ्रॅक्चर झाली होती आणि तिची फुफ्फुसे उघडी पडली होती,” अशी माहिती एका सूत्राच्या हवाल्याने न्यूज 18 ला दिली आहे.
आपल्या 8 पानांच्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांच्या टीमने तिच्या शरीरावर एकूण 40 जखमा झाल्या होत्या, असं सांगितलंय. तसेच काही जखमा काळ्या झाल्या होत्या, तसेच ब्रश बर्न इफेक्ट्समुळे काही जखमा अस्पष्ट होत्या, असंही ते म्हणाले. “जखमा या अँटमॉर्टेम, पेरीमॉर्टेम आणि पोस्टमॉर्टेम स्वरूपाच्या होत्या,” असंही त्या सूत्राने सांगितलं. डोक्याला, मणक्याला, डाव्या बाजूच्या फीमरला आणि खालच्या दोन्ही अवयवांना झालेल्या दुखापतीमुळे तिचा खूप रक्तस्त्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
“या सर्व जखमांमुळे मृत्यू होऊ शकतो. डोकं, मणके, हाडं आणि इतर दुखापतींमुळे सामूहिक किंवा एका जखमेमुळेही मृत्यू होऊ शकतो. तिच्या शरीरावरील सर्व जखमा अपघात आणि फरफटल्यामुळे होणं शक्य आहे. पण तरीही बायोलॉजिकल सँपलचं केमिकल अॅनालिसीस केल्यानंतर अंतिम मत दिलं जाईल,” असं सूत्राने सांगितले.
हे ही वाचा : 3 दिवसात 3 भीषण अपघात, दोघींनी सोडला जीव, तिसरी रुग्णालयात देतेय झुंज; नव्या वर्षाची सुरुवात हादरवणारी!
1 जानेवारीच्या पहाटे अंजलीच्या स्कूटीला भरधाव वेगात असलेल्या बलेनोने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कंझावाला परिसरात सापडला असून पाचही आरोपींना सोमवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर इतर अनेक जखमांचा उल्लेख आहे, तसंच तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही, असंही म्हटलंय.
मेडिकल बोर्डाने सांगितलं, की त्यांनी केमिकल अॅनालिसीससाठी व्हिसेरा, कापूस किंवा रेशमाच्या कापडाच्या तुकड्यावर रक्त आणि पीडितेची फाटलेली जीन्स जपून ठेवली आहे.
“डोके, पाठीचा कणा, डावं फीमर आणि दोन्ही खालच्या अवयवांना दुखापती झाल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तिच्यावर अत्याचार झालेला नाही. पण अंतिम अहवाल योग्य वेळी दिला जाईल, तसंच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,” असे दक्षिण दिल्लीचे विशेष सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलं.