गाझियाबाद, 4 जानेवारी: एका तरुणानं (Youth) फ्लिपकार्टवरून (Flipkart) ऑनलाईन विष (Online Poison) मागवून आत्महत्या (Suicide) केल्याप्रकरणी न्यायालयानं (Court) गुन्हा (FIR) दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत. या विषाचा खुलेआम पुरवठा करणाऱ्या फ्लिपकार्टविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणानं निराशेच्या गर्तेत ऑनलाईन विष ऑर्डर केलं होतं. ते प्यायल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. काय आहे प्रकरण दिल्ली एनसीआरच्या जवळ असणाऱ्या गाझियाबादमध्ये राहणारा अब्दुल वाहिद नावाचा तरुण रिक्षा चालवत होता. लॉकडाऊनच्या काळात धंदा मंदावल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्याने फ्लिपकार्टवरून 199 रुपये किंमतीचं सल्फास नावाचं विष मागवलं. 10 सप्टेंबर 2021 या दिवशी मागवलेलं हे विष त्याला 18 सप्टेंबर रोजी मिळालं. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच 24 डिसेंबरला त्यानं विषप्राशन केलं. त्यानंतर गंभीर अवस्थेतील अब्दुलला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. भावाने फोडली वाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खुलेआम विष विकणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीविरोधात अब्दुलचा भाऊ शाहिदनं कोर्टात धाव घेतली. निराशेच्या गर्तेत असणाऱ्या आपल्या भावाला सहजासहजी विष मिळालं नसतं, तर त्याचा जीव वाचला असता, असा दावा त्याने केला आहे. कुणालाही सर्रास विष देणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल कऱण्याची मागणी त्याने न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्याची मागणी मान्य करत पोलिसांना फ्लिपकार्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. फ्लिपकार्टचे संचालक आणि एरिया मॅनेजर यांच्याविरोधात गुन्हे दाखल होणार आहेत. हे वाचा- तुला माझ्यासारखे हजार मिळतील पण.., Instagram वर स्टोरी ठेवून तरुणानं संपवलं जीवन अमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टवरही आरोप काही महिन्यांपासून ऑनलाईन विष विक्री, ऑनलाईन स्फोटकं विक्री यासारख्या प्रकारांमुळे अमेझॉनवर गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात आता फ्लिपकार्टवरही गुन्हा दाखल झाल्यामुळे ऑनलाईन विष विक्रीचा प्रकार गंभीर होत चालल्याचं दिसून येत आहे.