घटस्फोट फेटाळल्याप्रकरणी दाखल याचिकेवर मोठा निर्णय
बिलासपूर, 6 फेब्रुवारी : पती-पत्नीचा वाद आपल्याला काही नवीन नाही. अनेकदा हा विकोपाला जाऊन प्रकरण विभक्त होण्यापर्यंत जाऊन पोहचते. अशाच एका प्रकरणात छत्तीसगड उच्च न्यायालयाने घटस्फोट फेटाळण्याच्या याचिकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघून या प्रकरणावर निकाल दिला आहे. पतीच्या अर्जावर कौटुंबिक न्यायालयाने पती-पत्नीमधील दुरावा लक्षात घेऊन पतीचा घटस्फोटाचा अर्ज मान्य करत घटस्फोटाचा निकाल दिला आहे. या निर्णयाविरोधात पत्नीने छत्तीसगड उच्च न्यायालयात धाव घेतली आणि एका याचिकेद्वारे घटस्फोटाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. या प्रकरणात न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींचा विचार करून आणि पुराव्याच्या आधारे पतीसाठी पत्नीचे वर्तन क्रौर्य असल्याचे मान्य केले. नवऱ्यावर अनैतिक संबंधांचे आरोप आणि गोंधळ घालणे हे सर्व क्रौर्याच्या श्रेणीत येते. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पत्नीची याचिका फेटाळताना कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. 2010 मध्ये विवाह 2010 मध्ये धमतरी जिल्ह्यातील कुरुड येथील सब इंजिनियरने रायपूर येथील एका विधवेशी लग्न केले होते. लग्नानंतर काही वर्षे सर्व काही ठीक चालले. यादरम्यान त्यांना एक मूलही झाले. पण, काही वर्षांतच पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ लागला. कुटुंबातून वेगळं राहण्यासाठी पत्नीने वाद घालायला सुरुवात केली. शेवटी मुलगा (पती) आपल्या आई-वडिलांपासून वेगळा राहू लागला. मात्र, त्यानंतर महिलेने आपल्या अधिकारी पतीवर सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करणे सुरूच ठेवले. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. वाचा - सावकारी पाशाचा आणखी एक बळी; नाशिकमध्ये कर्जाला कंटाळून दोघा भावांनी घेतलं विष
घटस्फोटाचे कारण काय? सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत पत्नी वारंवार पतीच्या ऑफिसमध्ये जाऊन पतीला शिवीगाळ, दमदाटी आणि अपमानित करत असे. यामुळे पतीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करून घटस्फोट घेतला होता. याशिवाय अनैतिक संबंधाच्या आधारे कुटुंब वाचवण्यासाठी पतीची बदली करण्यासाठी राज्याच्या एका मंत्र्याकडे अर्जही करण्यात आला होता. या सर्व गोष्टींनी त्रस्त झालेल्या अभियंता पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मंजूर झाला. न्यायालयाने काय सांगितलं? घटस्फोटाविरोधात पत्नीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, अनैतिक संबंधाच्या आधारे बदलीचा पतीचा दावा आणि अनैतिक संबंध असल्याचा आरोप तसेच कार्यालयात होणारा गोंधळ यातून पत्नीची क्रूरता सिद्ध होते. या प्रकरणी न्यायालयाने घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पत्नीची याचिका फेटाळली.