24 जानेवारीच्या रात्री कॅरल घरातून बाहेर पडली होती. ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती.
पालघर, 06 फेब्रुवारी : मुंबई जवळील पालघरमध्ये (palghar) तीन दिवसांपूर्वी एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत उलगडा केला आहे. प्रेमसंबंधातून या तरुणीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. पालघरच्या वाघोबा घाटात बुधवारी एका अनोळखी महीलेचा मृतदेह आढळला होता. कॅरल मिस्किटा (Carol Miskita) (वय 28) असं मृत तरुणीचे नाव आहे. पालघरमधील वाघोबा घाट परिसरात बुधवारी तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिच्या बॉयफ्रेण्डसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याची फिर्याद पालघरच्या भाविका भगवान पाटील यांनी पालघर पोलीस ठाणे येथे दिली. बुधवारी दुपारी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून दत्तात्रय शिंदे यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी, पोलीस निरीक्षक विष्णु भोये, प्रदिप कसबे, सुधिर धायरकर, संदिप कहाळे, सतिश गवई तसंच पालघर विभागातील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तातडीने गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यावेळी मृत महिलेबाबत बांद्रा पोलीस ठाणे मुंबई येथे मिसिंग नोंद दाखल असल्याची माहिती तपास पथकाला प्राप्त झाली. या गुन्ह्यात या एकमेव पुराव्याच्या आधारे तपास करून दोन संशयित इसमांना विरार कन्हेर फाटा व वांद्रे येथून ताब्यात घेतले. या दोघांकडून कसून चौकशी केली असता, त्यांनी यातील मयत महिला हिला प्रेमसंबंधातून जीवे मारून बाघोबा घाटात टाकून दिल्याची कबुली दिली. …म्हणून झाली कॅरलची हत्या 24 जानेवारीच्या रात्री कॅरल विले पार्ल्यातील घरातून बाहेर पडली होती. ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. पण, त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह 3 फेब्रुवारीला पालघरमध्ये आढळून आला होता. कॅरल ही एका बीपीओमध्ये कामाला होती. ती आपल्या आईसोबत राहत होती. कॅरलचे 2011 पासून आरोपी झिको मिस्किटासोबत प्रेमसंबंध होते. २४ जानेवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास ही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र कुमार देवेंद्र होता. तिघेजण बाहेर जेवणासाठी गेले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पालघरजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद पेटला. त्यामुळे रागाच्या भरात झिकोने कॅरलचा गळा दाबून खून केला. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने तिच्यावर चाकूने सपासप वारही केले. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून काढला. त्यानंतर कॅरलची स्कुटी झुडपात लपून ठेवली आणि तिचा मृतदेह हा वाघोबा घाट परिसरात फेकून दिला. कॅरल घरी परतली नसल्यामुळे तिच्या आईने सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कॅरलचा मृतदेह सापडल्यानंतर ओळख पटवण्यात आली असता मृतदेह हा कॅरलचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले आणि त्याच दोघे जण आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता झिकोने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास करत आहे.