प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : एखादा आजार असेल तर त्यावर उपचार घेण्यासाठी आजारी व्यक्ती रुग्णालयात जाते, पण डॉक्टरांनी उपचार न करता एखादा अवयवच काढून घेतला तर? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण ही घटना खरंच घडली आहे. किडनी स्टोनचे ऑपरेशन करून घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची किडनीच डॉक्टरांनी काढून घेतल्याचं समोर आलंय. पीडित व्यक्तीने या प्रकरणी डॉक्टरांवर गंभीर आरोप करून याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली आहे. या व्यक्तीचं नाव सुरेश चंद्र असून ते होमगार्ड आहेत. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील कासगंजमध्ये घडली आहे. या संदर्भात ईटीव्ही भारत हिंदी ने वृत्त दिलंय. होमगार्ड सुरेश चंद्र कासगंज डीएम निवासस्थानी तैनात आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला पाठदुखीचा त्रास होत होता. 12 एप्रिल 2022 रोजी त्यांची अल्ट्रासाउंड तपासणी करण्यात आली. त्यांच्या डाव्या किडनीमध्ये स्टोन असल्याचं टेस्ट रिपोर्टमध्ये दिसून आलं. यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी अलीगढमधील एका रुग्णालयात त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं व ऑपरेशननंतर ते घरी परतले, असं सुरेश यांनी सांगितलं. पीडित होमगार्ड सुरेश यांनी सांगितलं की, मुतखड्याचं ऑपरेशन केल्यानंतर 8 महिन्यांनी 29 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या पोटात अचानक खूप दुखू लागलं. यानंतर त्यांनी पुन्हा त्याच लॅबमध्ये अल्ट्रासाउंड तपासणी केली. अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाहून सुरेश यांना धक्का बसला. कारण त्यांची डावी किडनीच गायब असल्याचं त्यात म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
सुरेश यांनी सांगितलं की, या पूर्वी ज्या लॅबमध्ये त्यांनी अल्ट्रासाउंड टेस्ट केली होती, त्याच लॅबमधील एका कर्मचाऱ्याने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला सांगून अलीगढमधील रुग्णालयात ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. एवढंच नाही तर कर्मचाऱ्याने त्याला पैशाची काळजी करू नका, असंही सांगितलं होतं. ऑपरेशनच्या वेळी आपण घरून पैसे येण्याची वाट पाहत होतो. याबाबत रुग्णालयातील कर्मचारी फार निवांत दिसले. कारण त्या कर्मचाऱ्यांनीही आपल्याला पैशाची काळजी करू नका आणि लवकर ऑपरेशन करून घ्या, असं सांगितलं. हे वाचा - शरीरातील ऊर्जा कमी करतात ‘या’ 5 गोष्टी; लगेच रुटीनमध्ये करा बदल आता आठ महिन्यांनंतर पुन्हा पोटदुखी सुरू झाल्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूची किडनी गायब असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे लॅबमधील कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मिळून हा प्रकार केल्याची तक्रार सुरेश यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय.