बारामती, 27 फेब्रुवारी : कोयता गॅंग हा शब्द अलीकडच्या काळात खूप ठिकाणी चर्चिला जातो. पुण्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. कोयता जवळ बाळगणे ,कोयता फिरवणे, कोयता घेऊन धुडगूस घालणे, आणि कोयतेचा डीपी ठेवणे एकाला चांगलेच महागात पडलेय. कोयता गँगची दहशत मागच्या पुणे जिल्ह्यातल्या भागांमध्ये काही दिवसांपासून सुरू आहे. या घटनांमधून नेहमीचा गुन्हा तर आहेच परंतु समाजामध्ये दहशत निर्माण करणे, समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेलाच हात घालणे, असा इरादा दिसून येतो, त्यातून त्याची गुन्हेगारी मनोवृत्ती दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सक्त कारवाई करण्याचे आदेश देत असतात. अलीकडे कोयत्याचे डीपी किंवा इतर हत्यारांसहित डीपी ठेवण्याचे प्रकार वाढल्याने सोशल मीडिया सेल व सायबर क्राईम विभागातर्फे अशा घटनांवर सतत लक्ष असते. arpit_mohite_king_of_baramati या इन्स्टाग्राम आयडीवरून कोयत्यासह एका युवकाने फोटो ठेवला होता. या पोस्टची बारामती शहर पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ इंस्टाग्राम वर कोयत्यासह आपला फोटो ठेवणाऱ्या इसमाचा शोध घेतला. या व्यक्तीचं नाव अर्पित सचिन मोहिते असून त्याचं वय 22 वर्ष आहे. बारामती एसटी स्टँडच्या पाठीमागे इंदापूर रोडवर हा तरुण राहतो. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणलं तेव्हा त्याने आपण हा फोटो चार वर्षांपूर्वी काढला होता. कोयत्यासोबतच्या फोटोची क्रेज म्हणून आपण तो इन्स्टाग्रामवर ठेवल्याचं त्याने पोलिसांना तपासात सांगितलं. पोलिसांनी अर्पितवर तत्काळ कारवाई करत भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 प्रमाणे कारवाई केली. त्याच्या घरात वळचणीला ठेवलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. बारामती शहरामध्ये अशाप्रकारे कोणाच्याही डीपीवर गुन्हेगारी मजकूर, हत्यारे, खुन्नस शब्द याबाबतचे डीपी दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.