आरोपी तरुण (डावीकडे) आणि जखमी तरुण (उजवीकडे)
नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 5 जुलै : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना राज्यात घडत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. बहिणीसोबत प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरत जावयावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ओमप्रकाश बळीराम पडारे ओमप्रकाश बळीराम पडारे (वय-28, रा. जैतपुर/बारवा) असे जखमी जावई तरुणाचे नाव आहे. बहिणीसोबत प्रेम विवाह केल्याचा राग काढत त्याला कुऱ्हाडीने मारून गंभीर केले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कवडसी /खैरी परिसरात घडली आहे. जखमी गुरढा येथे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. ओमप्रकाशने आरोपीच्या बहिणीशी जानेवारी महिन्यात प्रेम विवाह केला होता. त्यावेळी भांडण झाले असता पोलीस तक्रारही झाली होती. मात्र, आज घडलेल्या घटनेमुळे परिसर हादरला आहे. आरोपीने जावई तरुणाच्या गाडीला ठोकत आधी हाताने गळा दाबला. नंतर स्वतः जवळ असलेल्या कुऱ्हाडीने तीन वार करत त्याला गंभीर जखमी केले. यावेळी बाजूच्या घरातील तरुणांनी पुढाकार घेत ओमप्रकाशला वाचविण्याच प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्याचा जीव वाचला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. जखमीला उपचारासाठी लाखांदूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती पालांदुर पोलिसांना देण्यात आली आहे. तसेच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.