प्रयागराज, 16 एप्रिल : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील रुग्णालयात नेण्यात येत असताना पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असतानाही तिघांनी अतिक आणि त्याच्या भावावर गोळ्या झाडल्या. या तिघांना पोलिसांनी तेव्हाच पडकलं. पकडण्यात आलेले तिघे आरोपी याआधी हत्या, चोरी यासह इनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात होते. तुरुंगातच त्यांची ओळख झाल्याचं म्हटलं जात आहे. अतिक आणि अशरफ यांची हत्या करून त्यांना स्वत:ची दहशत निर्माण करायची होती अशी माहिती आता समोर येत आहे. दोन्ही भावांच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी आहेत. तिघांचे म्हणणे आहे की, अतिकचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध होते. लष्कर ए तैयबाशीही त्याचं कनेक्शन होतं. अतिक गँगमुळे सगळेच भीतीच्या छायेखाली होते आणि त्यामुळे आम्ही त्याला मारलं. गँगस्टर अतिक अहमद याची हत्या, पोलिसांसमोरच हत्येचा LIVE VIDEO अतिक अहमदवर हल्ला करणारे तिघेही पत्रकार बनून गर्दीत घुसले होते. अतिक पत्रकारांशी बोलत असताना अचनाक तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. पोलिसांसमोर आरोपींनी जबाब देताना म्हटलं की, अतिकचं पाकिस्तान कनेक्शन होतं. त्याने आणि गँगने अनेक निरपराध लोकांची हत्या केली होती. जमीन हडपण्यासाठी तो हत्या करायचा. त्याविरोधात कुणी साक्ष दिली तर त्यांच्यावरही हल्ला केला जायचा. अशरफसुद्धा त्यात सामील असायचा. पोलिसांनी अटक केलेले तिघेही वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यांची ओळख तुरुंगात झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, पोलीस यांच्या मागे कोणत्या मोठ्या गँगचा हात आहे का याचा तपास करत आहे. तिघांचे वय कमी असून ते २० ते २५ वर्षांचे असल्याचं म्हटलं जात आहे. अतिक अहमदवर हल्ला केल्यानंतर तिघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला नाही.