प्रयागराज, 16 एप्रिल : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना घटनास्थळीच पकडण्यात आले. अतिक अहमदच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. प्रयागराज, उन्नावसह सर्व जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कलम १४४ लागू केले आहे. अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह कडेकोट बंदोबस्तात शवविच्छेदनासाठी नेले जातील. पाच डॉक्टरांचे पॅनेल शवविच्छेदन करेल. त्यानंतर दोन्ही मृतदेह चकिया इथं दफन केले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चकियामध्ये जवळपास ४ हजारहून अधिक कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. गँगस्टर अतिक अहमद याची हत्या, पोलिसांसमोरच हत्येचा LIVE VIDEO मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज त्यांचे सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. अतिक अहमद आणि अशरफ या दोघांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयागराजच्या घटनेची माहिती घेतली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून दर दोन तासांनी अपडेट घेतले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी डीजीपींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रयागराजमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री झालेल्या या हत्या प्रकरणानंतर देवरिया पोलीसही अलर्ट आहेत. मुस्लिम बहुल भागात पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला. अतिक अहमद अनेक महिने देवरियातील तुरुंगात होता. अतिक अहमदविरुद्ध १०० हून अधिक गुन्हे दाखल होते.