धुळे, 28 मे : जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) तालुक्यातील महिला उपसरपंचांबाबत (Woman Deputy Sarpanch) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील महिला उपसरपंच यांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पदाचा गैरवापरबाबत काय तक्रार? शिरपूर तालुक्यातील थाळनेर (Thalner Woman Deputy Sarpanch) येथील महिला उपसरपंच यांनी पदाचा गैरवापर केला. तसेच या माध्यमातून कुटुंबातील तीन जणांना पंतप्रधान आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) आणि शबरी योजनेचा (Shabri Gharkul Yojna) लाभ मिळवून शासनाची फसवणूक केली आणि घरकूल मंजूर करुन घेतले. इतकेच नव्हे तर पूरग्रस्त कॉलनीतील खुल्या भुखंडाची जागा प्रशांत कोळी यांच्या नावे बेकायदेशीररित्या करुन घेतली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य विजय संतोष बागूल यांनी प्रभारी बीडीओ सचिन शिंदे यांना दिले आहे. कुणाच्या नावावर केले घरकूल मंजूर - आशाबाई वामन कोळी, असे या महिलेचे नाव आहे. आशाबाई या थाळनेर गावाच्या उपसरपंच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. तसेच या माध्यमातून खुले भूखंड, कुटुंबातील सदस्यांच्या नावे घरकूल आणि इतर व्यक्तींच्या नावे तडजोडी करुन मंजूर केल्या. प्रशांत वामन कोळी, वामन रामचंद्र कोळी, यशोमती वामन कोळी या आपल्याच कुटुंबातील तीन सदस्यांच्या नावाने पदाचा गैरवापर करुन उपसरपंच आशाबाई कोळी यांनी घरकूल मंजूर करुन घेतले. हेही वाचा - कॉपी करताना पकडल्याने एक वर्षासाठी निलंबित; विद्यार्थ्याने घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय चौकशी करुन कायदेशीर कारवाईची मागणी तसेच या मंजुरीसाठी त्यांनी घर, शेती, नोकरी व्यवसाय आणि परित्यक्ता प्रमाणपत्र याबाबत संगनमताने खोटी माहिती सादर केली आणि याप्रकारे शासनाची फसवणूक केली, अशी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भातील तक्रारी पंचायत समिती सदस्य विजय बागूल यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य विजय संतोष बागूल यांनी प्रभारी बीडीओ सचिन शिंदे यांना दिले आहे.