मुंबई, 03 मे: मुंबईच्या (Mumbai) मालाड परिसरात अमानुषतेच्या सर्व परिसीमा गाठणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका विकृतानं धारदार शस्त्रानं एका पाळीव मांजरीची (Cat) शेपटी कापली आहे. ही धक्कादायक घटना समोर येताच एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (Complaint Filed) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस (Police) सध्या अज्ञात आरोपीचा शोध घेत असून परिसरात अनेकांची चौकशी केली जात आहे. संबंधित घटना मालाडमधील एस. व्ही. रोड येथील भाद्रण नगर परिसरातील आहे. येथील रहिवासी असणाऱ्या 36 वर्षीय अजय रमेश शहा यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली आहे. पीडित मांजर गेल्या काही काळापासून फिर्यादीच्या घरात अधून मधून जात असते. या मांजरीला फिर्यादी अनेकदा खायला देतात. त्यामुळे फिर्यादीच्या घरात मांजरीचा नेहमी वावर असतो. पण काल ही मांजर घरी आली असता, तिची शेपटी एका धारदार शस्त्रानं कापल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी या मांजरीला उपचारासाठी जवळच्या प्राण्यांच्या रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर या मांजरीची शेपटी धारदार शस्त्राने कापली असल्याची पुष्टी केली आहे. या विकृत घटनेची माहिती पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांना समजताच त्यांनी पोलिसांत रितसर गुन्हा दाखल करण्याचा सल्ला फिर्यादी अजय शहा यांना दिला. यानंतर पोलिसांनी शहा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. हे ही वाचा- मुक्या जीवाला अमानुष मारहाण; निर्दयी युवकाने कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने केला वार या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी कुडाळकर यांनी लोकमत ला सांगितलं की, संबंधित जखमी झालेल्या मांजरीनं महिनाभरापूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला होता. या मांजरी अमानुष हल्ला करणाऱ्या अज्ञाताला शोधण्यासाठी आमची एक टीम यावर काम करत असल्याची माहितीही कुडाळकर यांनी दिली आहे.