प्रातिनिधिक फोटो
नरेंद्र मते, प्रतिनिधी भंडारा, 13 फेब्रुवारी : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील नेरला येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका 31 वर्षीय व्यक्तीने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक व्यक्तीने आत्महत्या का केली? यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतक व्यक्तीला पत्नीसह तीन वर्षांची लहान मुलगी आहे. मुलगी आणि लहान मुलीची जबाबदारी असताना तरुणाने इतका मोठा टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न गावातील नागरिकांना सतावतोय. मृतक 31 वर्षीय तरुणाचं नाव पगमेश्वर रामदास पाल असं आहे. तो नेरला येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांपासून डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. त्यातूनच त्याला मद्यप्राशनाची सवय जडली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. पगमेश्वर नेमकं कोणत्या दु:खात होता ते समजू शकलेलं नाही. पण त्याने आज टोकाचा निर्णय घेतला. त्याने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ( खुनाच्या गुन्ह्याचा पश्चाताप,जेलमध्ये उचलले भयावह पाऊल, कैदीही हादरले ) पगमेश्वरने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्या कुटुंबियांना ही बाब लक्षात येतात त्यांनी धावाधाव केली. पगमेश्वरचा मृतदेह बघून कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. गावकऱ्यांच्या मदतीने पगमेश्वराचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. यावेळी त्याच्या कुटुंबियांचा सुरु असलेल्या आक्रोशामुळे गावकऱ्यांचेदेखील डोळे पाणावले. संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून पगमेश्वरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पगमेश्वरने खरंच आत्महत्या केली की आणखी काही दुसरं कारण आहे याची माहिती कदाचित त्याच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.