कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?
मुंबई 09 एप्रिल : एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे लसच शिल्लक नसल्यानं (Vaccine Shortage) अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणच बंद (Vaccination centers Shut) असल्याची भयंकर स्थिती आहे. पुढील आदेश येईपर्यंत बेकेसीमध्ये लसीकरण केंद्र बंद राहाणार आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील बारामतीत आतापर्यंत 52 हजार 321 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही जणांनाच पुरेल एवढाच लसीचा शिल्लक साठा आसल्याने आज लसीकरण करण्यात येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकारी सदानंद काळे यांनी सांगितलं. दिवसभरात दररोज चार ते साडेचार हजार जणांना याठिकाणी लस देण्यात येते. मावळमध्ये लसीकरण बंद - जिल्हास्तरावरून लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरण बंद राहणार आहे. मावळ आरोग्य विभागाकडून मावळसाठी मागील तीन दिवसांपासून 10 हजार लसींची मागणी केली जात आहे. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. सोलापुरातील साठा कमी - सोलापुरात एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. आज किंवा उद्यापर्यंत आणखी साठा येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाशिममध्येही साठा कमी - जिल्ह्यात केवळ एक दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. कोविशिल्ड 940 आणि कोव्हॅक्सिनचे 2720 असे एकूण 3660 डोस शिल्लक आहेत. लस तुटवड्यामुळे जिल्ह्यातील 130 पैकी 60 केंद्र बंद करण्यात आली आहेत. अमरावतीमध्ये 1 दिवस पुरेल एवढाच लस साठा - जिल्ह्यात 2 लाखावर कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाला होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र आता जिल्ह्यात केवळ 1 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रनमले यांनी दिली आहे. आरोग्य विभागाने लसींचा साठा उपलब्ध करून दिला नाही तर जिल्ह्यातील लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा - जिल्ह्यात सध्या 10 हजार डोस शिल्लक आहेत. आतापर्यंत 75 हजार 13 डोस दिले गेले आहेत. आणखी 5 लाख डोस गरजेचे आहेत. नांदेडमध्ये दोन ते अडीच दिवस पुरेल इतका साठा - जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 38 हजार 530 लसीचे डोस उपलब्ध झाले. त्यापैकी 1 लाख 95 हजार लोकांना दिलेले आहेत. सध्या 47 ते 50 हजार डोस आता उपलब्ध आहेत . जिल्ह्यातील 51 लसीकरण केंद्रावर दररोज 20 हजार डोस दिले जातात. हेही वाचा - देशात 5 दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत तुटवडा अकोल्यातही साठा कमी - जिल्ह्यात सध्या जवळपास 12 हजार लसीचा साठा आहे, उद्या छोटा साठा येणार आहे अशी माहिती आहे. आतापर्यंत एक लाख बारा हजार लोकांना लस देण्यात आली आहे. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आज पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक - मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात लसीचा साठा संपत आला असून आज पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. लस उपलब्ध नाही झाली तर शनिवारपासून लसीकरण बंद करण्याची वेळ येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातही लसीचा तुटवडा - यवतमाळ जिल्ह्यात फक्त 4 हजार लस शिल्लक असून अनेकांना लस न घेताच केंद्रावरून परत जाण्याची वेळ येत आहे. जिल्ह्याला आतापर्यंत 1 लाख 55 हजार लस साठा प्राप्त झाला होता. त्यापैकी 1 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. हेही वाचा - अटीतटीच्या प्रसंगीही होतोय Remdesivir चा काळाबाजार! मुंबईत कारवाईचं सत्र सुरू गुरुवारपासून या ठिकाणची लसीकरण केंद्र बंद - सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये लशीचा तुटवडा असल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारपर्यंत खेड तालुक्यात केवळ दहा टक्केच लसीकरण झालं असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.