नेवार्क, 22 डिसेंबर: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला (Corona Virus) हरवण्यासाठी लस (Vaccine) आली आहे. पण लोकांच्या मनात या लशींचा सुरक्षिततेबाबत शंका आहेत. लस खरंच प्रभावी आहे का, तिचे दुष्परिणाम काय असतील, या लोकांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, त्यांनी निर्धास्तपणे लस टोचून घ्यावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेले जो बायडेन (Joe Biden) यांनी सोमवारी स्वतःच ही लस टोचून घेतली आहे. बायडेन 78 वर्षांचे असून, ते उच्च जोखीम गटात येतात. तरीही त्यांनी ही लस टोचून घेतली आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर केलं. त्यामुळं नवीन वर्षात ही लस सर्वत्र उपलब्ध होईल, तेव्हा लोक ही लस टोचून घेतील आणि कोरोनाचा धोका संपुष्टात येईल असा बायडेन यांचा विश्वास आहे. बायडेन म्हणाले की, कोरोना विषाणूशी लढा देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. 3 लाख 15 हजारांहून अधिक अमेरिकन नागरिकांचा बळी घेणाऱ्या आणि 1 कोटी 75 लाखांहून अधिक लोकांना लागण झालेल्या या विषाणूवर मात करण्याला त्याचं प्राधान्य आहे. 20 जानेवारीला अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते याच लढ्याला प्रथम प्राधान्य देणार आहेत. बायडेन लाखो अमेरिकन नागरिकांपर्यंत ही लस पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेणार असून, राजकारण करण्यासाठी ही लस घाईघाईने आणण्यात आल्याची शंका उपस्थित करणाऱ्या लोकांची चिंता दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. (हे वाचा- धक्कादायक! नवीन कोरोना विषाणूचं संक्रमण केवळ ब्रिटनपुरतं मर्यादित नाही ) बायडेन यांनी पत्रकारांच्या उपस्थितीत डेलावेअर, नेवार्क इथल्या क्रिस्टीयाना हॉस्पिटलच्या मुख्य नर्स टेब मासा यांच्याकडून ही लस टोचून घेतली. फायझर (Pfizer) कंपनीनं विकसित केलेली ही लस आहे. ही लस टोचून घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, बायडेन यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हिरो म्हणत त्यांचं कौतुक केलं. ज्या वेळी ही लस उपलब्ध होईल, त्या वेळी ती टोचून घेण्यासाठी लोकांनी तयार राहावं, यासाठी मी लस टोचून घेतली आहे. काळजी करण्यासारखं यात काहीही नाही, असंही बायडेन यांनी यावेळी सांगितलं. बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन (Jill Biden) यांनीही ही लस टोचून घेतली असून, त्याही या वेळी उपस्थित होत्या. (हे वाचा- ‘कोरोनाच्या लशीमुळे कायमच वंध्यत्व’; ‘या’ देशात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण ) कमला हॅरिसही टोचून घेणार लस ‘अर्थात लस येण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे, त्यामुळं लोकांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मानावा, येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कुठेही प्रवास करू नये, असं आवाहनही बायडेन यांनी या वेळी केलं. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिसही (Kamala Harris)पुढील आठवड्यात ही लस टोचून घेण्याची शक्यता आहे, असं बायडेन यांच्या ट्रान्झिशन टीमनं म्हटलं आहे. कोरोना साथीमुळ आर्थिक अडचणीत सापडलेल्या अमेरिकन नागरिकांना दिलासा देण्यासाठी 900 बिलियन डॉलर्सचा निधी मजूर करण्यात आला आहे. दरम्यान, बायडेन यांनी नॅशनल इकोनॉमिक काउन्सिलमधील (NEC) आणखी काही नवीन सदस्यांची नावं जाहीर केली आहेत. नागरिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य आर्थिक धोरण तयार करण्याचं काम ही तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. बराक ओबामा (Barak Obama) यांच्या काळात व्हाईट हाऊसचे (White House) अधिकारी असलेले डेव्हिड कामीन हे नॅशनल इकोनॉमिक काउन्सिलचे उपसंचालक असणार आहेत. तर सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांचे यंदाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूक मोहिमेतील माजी आर्थिक सल्लागार भारत राममूर्ती हे नॅशनल इकोनॉमिक काउन्सिलमधील आर्थिक सुधारणा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे उपसंचालक म्हणून काम करणार आहेत, असंही बायडेन यांच्या टीमनं एका निवेदनात जाहीर केलं आहे. आर्थिक धोरणांबाबत अध्यक्षांचे विशेष सल्लागार म्हणून जोएल गॅम्बल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (हे वाचा- Alert! ब्रिटनमधील नव्या Corona Virus मुळे भारतासह ‘या’ देशांनी घातली प्रवास बंदी ) पूर्वी होत्या तशाच गोष्टी आता करणं शक्य नाही, आता ही वेळ नवीन सर्वसमावेशक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आहे, असं बायडेन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. ओबामा यांच्या काळात वाहन उद्योगाला बेल आऊट पॅकेज देण्यात आणि पॅरिस हवामान बदल करारात महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रायन डीझ यांचीही या काउन्सिलमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. जॉर्जिया इथं 5 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बायडेन यांच्या व्हाईट हाउसचा अजेंडा अवलंबून आहे. यु. एस. कॉंग्रेसमधील वरिष्ठ सभागृहात कोण राज्य करेल याचा निर्णय या निवडणुकीवर अवलंबून आहे. दरम्यान, कमला हॅरिस या निवडणूकीतील उमेदवार जॉन ऑसोफ आणि राफेल वोर्नोक यांच्या प्रचारासाठी जॉर्जियातील कोलंबस इथं भेट देणार आहेत. त्यानंतर आर्थिक पॅकेजवरील मतदानाच्या एक दिवस आधी त्या वॉशिंग्टनमध्ये दाखल होतील. दरम्यान, या निवडणूकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डेव्हिड पर्ड्यू आणि केली लोएफ्लर यांच्या प्रचारासाठी ट्रम्प यांची कन्या आणि व्हाईट हाउस सल्लागार इव्हान्का ट्रम्प जॉर्जियामध्ये हजेरी लावणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांना ‘कोविड 19’ ची लागण झाल्यामुळं ऑक्टोबरमध्ये त्यांना काही काळासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे अनेक सल्लागार आणि व्हाईट हाउसचे कर्मचारी यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.