नेपाळ क्रिकेटर संदीप लमिछानेला अटक
काठमांडू, 6 ऑक्टोबर: नेपाळ पोलिसांनी आज सकाळी एक मोठी कारवाई केली आहे. नेपाळचा युवा क्रिकेटर आणि माजी कर्णधार संदीप लमिछानेला आज नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट खेळण्यासाठी देशाबाहेर असलेला लमिछाने आज मायदेशात परतला. त्याचवेळी नेपाळ पोलिसांनी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्याला ताब्यात घेतलं. संदीप लमिछानेनं कालच फेसबुक पोस्ट करुन नेपाळमध्ये परत येणार असल्याचं सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज नेपाळ पोलिसांनी ही कारवाई केली. काय आहे प्रकरण**?** संदीप लमिछानेवर एका 17 वर्षांच्या मुलीवर काठमांडूच्या एका हॉटेलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संबंधित मुलीनं ऑगस्टमध्ये 22 वर्षांच्या लमिछानेनं आपल्यासोबत दुष्कृत्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला या मुलीला काठमांडूमध्ये अनेक ठिकाणी फिरवण्यात आलं. त्यानंतर त्याच रात्री हॉटेलमध्ये तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं. दरम्यान संदीप लमिछाने हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटर आहे. त्यानं 2018 साली दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडून पदार्पण केलं होतं.
लमिछानेनं फेटाळले आरोप संदीप लमिछानेनं मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानं काल केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय… ‘मी उद्या प्रामाणिकपणे काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10 वाजता दाखल होणार आहे. मला खात्री आहे की मला पूर्ण न्याय मिळेल आणि मी माझ्या देशासाठी पुन्हा खेळेन. मी चौकशीदरम्यान पूर्ण मदत करेन आणि मी निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाईदेखील लढेन.’
हेही वाचा - Ind vs SA ODI: ठरलेल्या वेळेत का सुरु होणार नाही भारत-दक्षिण आफ्रिका वन डे? BCCI ने दिली ही अपडेट लमिछानेच्या नावावर होतं अटक वॉरंट दरम्यान काठमांडूत पोहोचण्याआधीच संदीप लमिछानेवर अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. कालच पोलिसांनी तो नेपाळमध्ये नसल्यानं त्याला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेणार असल्याचं म्हटलं होतं. पण अखेर आज तो नेपाळमध्ये पोहोचला आणि पोलिसांनी एअरपोर्टवरच त्याला ताब्यात घेतलं.