नवी दिल्ली, 11 एप्रिल: 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही तिसरा म्हणजेच कोरोना लसीचा (Corona Vaccine) प्रिकॅाशन डोस म्हणजेच बुस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी 10 एप्रिलपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. रविवारी पहिल्याच दिवशी 9,496 जणांना बुस्टर डोस देण्यात आला. Co-WIN डॅशबोर्डनुसार, लसीचा तिसरा डोस देशभरातील सुमारे 850 खासगी संस्थांद्वारे लोकांना उपलब्ध करून देण्यात आला. कोरोनाचा दुसरा डोस घेऊन कमीत कमी नऊ महिने झालेले 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक या बुस्टर डोससाठी पात्र आहेत. बहुतेक रुग्णालयात सोमवारपासून कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येईल.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे ट्विट
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार कोरोनावर मात करण्यासाठी अनेक निर्णय घेत आहे. यासंदर्भात आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे, कोरोनाविरोधात सावधगिरीचा उपाय म्हणून बुस्टर डोस देण्यास मंजूरी मिळाली आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटपासून (Coronavirus New Variant) बचाव व्हावा यासाठी 10 एप्रिलपासून देशातील 18+ लोकसंख्येच्या गटासाठी कोरोनाला लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील दोन मोठ्या कोरोना लस निर्मात्या कंपन्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (Covishield, Covaxin) या दोन्ही लसींच्या किंमतीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट केली आहे. बुस्टर डोससाठी किती खर्च येईल? कोविशिल्ड लसीची किंमत आधी 600 रुपये तर कोव्हॅक्सिनची किंमत 1200 रुपये प्रति डोस इतकी होती. या लसी आता 225 रुपयांना मिळणार आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी डोस तयार करण्याचा खर्च सरकार उचलणार नाही. त्यासाठी खासगी केंद्रांवर लसीच्या किमतीनुसार पैसे द्यावे लागतील. सरकारने खाजगी केंद्रांवर कोव्हशील्डची किंमत 225 रुपये तर कोवॅक्सिनची किंमत 225 रुपये आणि स्पुतनिक व्हीची किंमत 1,145 रुपये निश्चित केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला आणि भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, सुचित्रा इल्ला यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. ही रक्कम Co-WIN अॅपच्या माध्यमातून आकारली जाणार आहे. Co-WIN प्रणाली सर्व नागरिकांना एसएमएस अलर्ट पाठवेल जे त्यांच्या डिजिटल रेकॉर्डमधील पहिल्या लसीकरण तपशीलांवर आधारित त्यांच्या तिसऱ्या शॉटसाठी पात्र असतील.