रत्नागिरी, 20 फेब्रुवारी: कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असणारा ‘शिमगा’ अर्थात होळी अगदी महिनाभरावर येऊन ठेपलेला असताना कोकणावर कोरोनाचं सावट आल्याचं पाहायला मिळतं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर परिस्थिती बिघडू लागली आहे. रत्नागिरीतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या खेड तालुक्यात कोरोनाबाधितांचे आकडे झपाट्याने वाढत असून गेल्या 5 दिवसात एका खेड तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 68 वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दापोली-खेडचे आमदार योगेश कदम यांनी देखील आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी कोव्हिड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेड याठिकाणी परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर शासनाने त्यांच्यावर कडक निर्बंध आणून कारवाई करावी अशा सूचना देखील जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना यावेळी आमदार योगेश कदम यांनी केल्या आहेत. (हे वाचा- हम नहीं सुधरेंगे! जमावबंदीनंतर नियमांची ऐशीतैशी, जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर ) 68 कोरोनाबाधितांपैकी 40 हून अधिक रुग्ण खेडच्या वरवली गावातील असून हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. शिवाय खेड तालुक्यातील अंबावली, पन्हाळजे, देवसडे, भरणे, धामनंद, चिंचघर, कुरवळ-जावळी, चिंचवली, मानी या गावांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने याठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (हे वाचा- शिवजयंतीच्या नियमांचा फज्जा, आमदारांसह 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल ) या 68 रुग्णांपैकी गेल्या 24 तासात 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत खेडमध्ये 1549 कोरोनाबाधित आढळून आले असून यापैकी 76 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर सध्या याठिकाणी ताण असल्याचं दिसून येते आहे. तसंच 76 जणांचे नमुने अद्याप प्रतीक्षेत आहेत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत ऐकून 9806 कोरोनाबाधित आढळून आले असून खेड पाठोपाठ रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर मध्ये देखील आढळले नवे रुग्ण आढळले आहेत.