मुंबई, 3 मार्च : रशिया-युक्रेनमधील युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशातच भारतात या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण का घेता येत नाही? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. यावर आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पुढाकर घेतला आहे. आनंद महिंद्रा यापूर्वी ट्विटरवर (Anand Mahindra Twitter) आपल्या अनेक ड्रीम प्रोजेक्ट्सची माहिती लोकांना दिली आहे. यासोबतच ते प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलतात. आता त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची, विशेषत: वैद्यकीय विद्यार्थ्यांची स्थिती (Indian Medical Student Stranded In Ukraine) जाणून घेत मोठे काम करण्याचे ठरवले आहे. महिंद्रा विद्यापीठात वैद्यकीय अभ्यास शिकवला जाणार? आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून सांगितले की, भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे हे मला माहीत नव्हते. त्यांनी त्यांची कंपनी टेक महिंद्राचे (Tech Mahindra) एमडी आणि सीईओ, सी. पी. गुरनानीला टॅग करत लिहिले की, ‘महिंद्रा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्याचा विचार करू शकतो का?’
कोट्यवधीत फी नसणार आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी त्यांना सांगितले की, भारतातून मोठ्या संख्येने मुले वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये केवळ जागांच्या कमतरतेमुळे जात नाहीत. त्यापेक्षा भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हेही एक मोठे कारण आहे. याबाबत पी. वमशीधर रेड्डी नावाच्या युजरने आनंद महिंद्रा यांना विनंती केली की, तुम्ही तुमच्या संस्थेत काळजी घ्या की त्याची फी इतर संस्थांप्रमाणे कोट्यवधीमध्ये नसावी, त्यावर आनंद महिंद्रा म्हणाले की, मी काळजी घेईन.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे शेअर केलेल्या बातमीनुसार, भारतातील सुमारे 18,000 मुले युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तर सर्वाधिक 23,000 मुले वैद्यकीय पदवी घेण्यासाठी चीनमध्ये गेले आहेत. इतके विद्यार्थी बाहेर शिक्षण घेतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं आहे. त्यामुळे लवकरच भारतात परवडणाऱ्या पैशात वैद्यकीय शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.