JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी योजना! 2025पर्यंत आणणार 10 नव्या इलेक्ट्रिक कार्स

टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी योजना! 2025पर्यंत आणणार 10 नव्या इलेक्ट्रिक कार्स

गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (Electric Vehicles) बोलबाला वाढला आहे. कारण नामवंत कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करू लागल्या आहेत. टाटा मोटर्स (Tata Motors) 2025 पर्यंत बॅटरीवर चालणाऱ्या 10 नव्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात सादर करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जून: गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (Electric Vehicles) बोलबाला वाढला आहे. कारण नामवंत कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करू लागल्या आहेत. टाटा मोटर्स (Tata Motors) 2025 पर्यंत बॅटरीवर चालणाऱ्या 10 नव्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात सादर करणार आहे. टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) यांनी अलीकडेच याबद्दलची घोषणा केली. सध्या टाटा कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक कार्स बाजारात आहेत. त्यापैकी टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) ही देशातली बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार आहे. गेल्या वर्षी बाजारात दाखल झाल्यापासून त्या मॉडेलच्या 4000 कार्सची विक्री झाली आहे. तसंच, टाटा टिगॉर (Tata Tigor) इलेक्ट्रिक कार प्रामुख्याने सरकारी वाहनांच्या ताफ्यात वापरली जाते. अलीकडेच कंपनीच्या शेअरधारकांशी संवाद साधताना चंद्रशेखरन यांनी ही घोषणा केली. ट्रान्स्पोर्टेशन क्षेत्रात शाश्वत पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या जागतिक पातळीवरच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवणं, हे कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या ग्रीन व्हेइकल्ससाठी (Green Vehicles) बॅटरी उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांशी भागीदारी करण्यासाठीचे पर्यायही शोधले जात आहेत, असंही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलं. ‘आमच्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या देशातल्या वापरामध्ये दुप्पट वाढ होऊन यंदा ते प्रमाण दोन टक्क्यांवर आलं आहे. येत्या काही वर्षांत या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, अशी आमची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेत हा बदल टाटा मोटर्स घडवून आणेल. आमची कंपनी 10 नव्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स बाजारात आणणार आहे. तसंच, या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी (Charging Infrastructure) देशभरात ठिकठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी टाटा समूह मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. भारत आणि युरोपातल्या बॅटरी, तसंच सेल उत्पादकांशी भागीदारी करण्याबद्दलही कंपनीचा शोध सुरू आहे,’ असं चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या 2020-21च्या वार्षिक अहवालातल्या संदेशात लिहिलं आहे. हे वाचा- तुमच्या कारमध्ये Airbag आहे का? चारचाकी असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ‘ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि इंजिनीअरिंगची शाखा सुरू करण्याबद्दल टाटा समूह विचार करत आहे. त्यामुळे कनेक्टेड आणि ऑटोनॉमस वाहनांच्या नव्या जगात आघाडी घेण्यास आम्हाला मदत होईल,’ असं चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. वाहतुकीचे शाश्वत पर्याय वापरण्याचा काळ येऊन ठेपला आहे. टाटा समूह त्यात वेगाने आघाडी घेईल. ग्राहकांच्या वाहन वापराच्या वर्तनात देशात आणि जगभरात बदल घडवून आणण्याच्या दिशेने टाटा समूह काम करील, अशी ग्वाही चंद्रशेखरन यांनी दिली आहे टाटा मोटर्सच्या JLR ने 2036 पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. जर्मन, तसंच अन्य ठिकाणच्या लक्झरी कारउत्पादकांनी अशा प्रकारच्या टाइमलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यात आता टाटा समूहाचाही समावेश झाला आहे. जग्वार 2025 पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक बनेल, तर 2030 पर्यंत जग्वार लँडरोव्हरच्या 60 टक्के कार्स बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स असतील, असं कंपनीने जाहीर केलं आहे. हे वाचा- कार खरेदी न करताच घरी आणा, Maruti Suzuki ची भन्नाट योजना ‘जगभरातल्या बिझनेस मॉडेल्समध्ये पर्यावरणविषयक शाश्वतता (Environmental Sustainability) या मूल्यावर मोठा भर दिला जाणार आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या धोरणांचा पायाच सस्टेनेबल बिझनेस मॉडेलच्या दृष्टीने उभारत आहोत. भारतात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेली आणि जगभरात ठसा उमटवलेली कंपनी म्हणून टाटा कंपनी यात आघाडी घेईल,’ असा विश्वास चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला. ‘टाटा ग्रुपच्या 150 देशांमध्ये कंपन्या आहेत. साडेसात लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना आमच्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. तसंच आमची उत्पादनं 650 दशलक्ष ग्राहक वापरतात. आम्हाला अजून बराच प्रवास करायचा आहे; पण आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे,’ असं चंद्रशेखरन यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या