मुंबई, 20 डिसेंबर : आजकाल बऱ्याच वस्तू आपण ऑनलाईन घरपोच मागवतो. घरपोच सेवा देणारे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखे इतर अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आज अस्तित्वात आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जी वस्तू आपण मागवतो, ती काही दिवसांच्या अवधीनंतर आपल्याला घरपोच मिळते. तसं पाहिले तर ही सेवा खूप छान आहे. पण एका ग्राहकांसाठी ही सेवा फार त्रासदायक ठरली आहे. रिपोर्टनुसार एका व्यक्तीने अॅमेझॉनवरुन सव्वा लाख रुपयांचा एक अॅपल मॅकबूक प्रो लॅपटॉप मागवला होता. पण त्याच्या घरी त्याऐवजी कुत्र्याचं खाद्य आलं. यामुळे ती व्यक्ती फारच वैतागली आहे. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवा या लोकांना फार आवडत आहेत. कोणताही त्रास न होता घरबसल्या कोणतीही वस्तू घरपोच मागवता येते. पण अनेकदा अपेक्षेनुसार होत नाही. इंग्लंडमध्ये अॅलन वूड नामक एका व्यक्तीने अॅमेझॉन या ऑनलाईन पोर्टलवरुन अॅपल मॅकबूक प्रो हा लॅपटॉप मागवला होता. त्यासाठी त्याने 1200 पाउंड म्हणजेच जवळपास 1 लाख 20 हजार रुपये भरले होते. पण त्याला लॅपटॉपऐवजी कुत्र्याचं खाद्य असलेलं पार्सल त्याच्या घरी आलं. हेही वाचा : Twitter ने काढलेले कर्मचारी बदला घेणार, एलन मस्कना जोरदार धक्का देणार! हा लॅपटॉप त्या व्यक्तीने 29 नोव्हेंबरला मागवला होता. आपल्या मुलीला भेटवस्तू देण्यासाठी त्याने अॅपल मॅकबुक प्रो हा लॅपटॉप मागवला होता. पण जेव्हा त्याला अॅमेझॉनकडून डिलिव्हरी मिळाली तेव्हा तो बॉक्स उघडून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. त्यात त्याला पेडिग्री डॉग फूडचे बॉक्स सापडले. Apple Insider च्या मते, त्या पार्सलमध्ये जेली फ्लेवर्सच्या मिश्रणाची 24 पाकिटं होती. हे पाहून आपण कल्पना करु शकतो की, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काय भाव आले असतील. अॅलन यांनी सांगितलं की, त्यांना कंपनीकडून मदतीची पूर्ण अपेक्षा होती; पण अॅमेझॉन सपोर्टकडून त्यांना पूर्ण मदत मिळाली नाही. अॅमेझॉन ग्राहक सेवाने त्यांना मदत नाकारली. परिणामी, त्यांनी मिळालेली वस्तू परत केली. अॅलनच्या मते, त्यांनी कंपनीशी संपर्क करण्यात जवळपास 15 तास घालवले. पण त्यांना अपेक्षित मदत मिळत नव्हती. पण अॅमेझॉनच्या एका प्रवक्त्याने आपण ग्राहकाच्या संपर्कात असून त्यांना त्यांचे पैसे कंपनीकडून परत केले जातील, असे स्पष्टीकरण दिलं आहे. हेही वाचा : लॅपटॉप घेण्याआधी फक्त एक गोष्ट चेक करा; तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल अॅलन यांनी सांगितलं की, ते अॅमेझॉनचे खूप जुने ग्राहक असून त्यांना असा अनुभव आधी कधी आला नव्हता. पण या घटनेमुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारच्या घटना भारतातदेखील घडल्याची उदाहरणं आहेत. यात आपण मागवतो एक पण दुसरीच एखादी वस्तू आपल्याला डिलिव्हर होते. अॅलनला त्याचा लॅपटॉप मिळेल अशी आशा करूया.