होंडा लवकरच लाँच करणार एसयुव्ही
मुंबई, 20 मे : होंडा दीर्घ काळानंतर भारतीय बाजारपेठेत नवीन एसयूव्ही लाँच करण्यास सज्ज झाली आहे. या मिड साइज एसयूव्हीची लाँचिंग पूर्वीच चर्चा सुरू झालीय. कंपनीच्या या नव्या एसयूव्हीचं नाव होंडा एलिव्हेट (Honda Elevate) असून जी भारतात 6 जून 2023 रोजी सादर केली जाऊ शकते. मात्र, भारतात ही गाडी लाँच होण्यापूर्वी तिचं बुकिंग सुरू झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, होंडा डीलरशिप असणाऱ्यांकडे एलिव्हेटचं बुकिंग 11,000 ते 21,000 रुपयांपर्यंत टोकन रक्कम घेऊन घेतलं जातयं. भारतात होंडा एलिव्हेट गाडीची स्पर्धा हुंडाई क्रेटा, मारुती ग्रँड व्हिटारा, टोयोटा अर्बन क्रुझर, टाटा हॅरियर आणि किया सेल्टोस या कारशी असेल. कंपनीनं अधिकृतपणे एलिव्हेट गाडीची लाँच तारीख जाहीर केलेली नाही. परंतु, ऑगस्ट 2023 पर्यंत ही गाडी रस्त्यावर धावताना दिसू शकते. होंडा एलिव्हेट कशी असेल? नवीन उत्सर्जन नियमांमुळे होंडा कंपनीनं त्यांची भारतातील सर्व डिझेल मॉडेल्स बंद केलीत. त्यामुळे पेट्रोल व्यतिरिक्त, डिझेल इंजिनमध्येदेखील एलिव्हेट आणली जाण्याची शक्यता कमी आहे. कंपनी या गाडीमध्ये त्यांचं नवीन हायब्रीड इंजिन वापरू शकते. हे इंजिन होंडा सिटीचं 1.5 लिटर पेट्रोल-हायब्रीड इंजिन सारखं असेल, जे ई-सीव्हीटी ट्रान्समिशनसह असू शकतं. होंडाचं हे हायब्रीड इंजिन मायलेज चांगलं देतं. हे इंजिन सिटी सेडानमध्ये 27.13 kmpl चा मायलेज देतं, तर एलिव्हेट गाडीत 25 kmpl मायलेज देईल. ही गाडी होंडा तिच्या जुन्या एसयूव्हीप्रमाणे फ्रंट व्हील ड्राइव्ह (FWD) प्रणालीमध्ये लाँच करू शकते. उत्तम फीचर्स होंडा एलिव्हेट एसयूव्ही फीचर्सच्या बाबतीत सिटी सेडान प्रमाणेच प्रगत असेल. टीझरमध्ये असं दिसून आलं आहे की, कंपनी यामध्ये सिंगल-पेन सनरूफ देत आहे. याशिवाय, या एसयूव्हीमध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी, अॅम्बियन्स लायटिंग, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस चार्जिंग, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, लार्ज इन्फोटेनमेंट डिस्प्ले, रिअर एसी व्हेंट्स आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम यासह अनेक प्रगत फीचर्स मिळतील. कंपनी या गाडीसोबत अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) फीचर देऊ शकते. या फीचरमध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ऑटोमॅटिक हाय बीम आणि लो स्पीड फॉलो फंक्शन यांचा समावेश असू शकतो. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11-12 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.