कार धुण्यासाठी शाम्पू, कार वॉश वापरताय? मग हे एकदा वाचा..
मुंबई, 20 एप्रिल- आपली कार स्वच्छ धुऊन चकचकीत करायला सर्वांनाच आवडतं. काही जण कार वॉशने तर काही जण शाम्पूने कार धुतात. काही जण कार स्वच्छ करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्सही वापरतात. अनेक जण चुकीच्या पद्धतीने कार स्वच्छ करतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे कार स्वच्छ होण्याऐवजी लवकर खराब होते. याचाच अर्थ स्वच्छतेच्या नावाखाली ज्याप्रकारे कार अक्षरशः घासून साफ केली जाते, त्यामुळे कार लवकर खराब होऊ शकते. कार क्लीनिंगच्या नवीन पद्धतीबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, कार याप्रकारे धुऊन स्वच्छ केली तर कार लवकर खराब होऊ शकते. अनेकदा कार स्वच्छ करताना अशा चुका केल्या जातात, की ज्यामुळे कारचा पेंट लवकर खराब होतो. वॉशिंग सेंटरला कार स्वच्छ करण्यासाठी पैसे जास्त लागत असल्याने अनेक जण घरीच गाडी स्वच्छ करणं पसंत करतात; पण साफसफाई करताना अशा चुका केल्या जातात, की ज्यामुळे गाडी लवकर खराब होते, असं लीजिंग ऑप्शन्स नावाच्या कंपनीच्या प्रोफेशनल्सनी सांगितलं. वाचा- मुंग्या नेहमी एका लाईनमध्ये का चालतात? नेमकं काय आहे कारण अशा प्रकारे कार स्वच्छ करणं टाळा तज्ज्ञांनी सांगितलं की, काही खास पद्धतींचा वापर करून कार धुतली, तर फार नुकसान होणार नाही. कारची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. शेव्हिंग फोमचा वापर बरेच जण कार स्वच्छ करण्यासाठी शेव्हिंग फोम वापरतात. त्या फोममध्ये कारसाठी योग्य घटक वापरले जात नाहीत. त्यामुळे शेव्हिंग फोमचा वापर केल्यास कारचा रंग उडू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लिक्विड वॉश डिश वॉशिंग प्रॉडक्ट्सचा वापर कार धुण्यासाठी करू नये. डिश वॉशमुळे भांड्यावरचे तेलकट डाग जातात, तर कारवरची घाण का स्वच्छ होणार नाही, असं अनेकांना वाटतं; पण या वॉशचा वापर केल्यास कारवरचं वॅक्स निघून जातं. हे वॅक्स कारच्या पेंटचं संरक्षण करत असतं. त्यामुळे कार धुण्यासाठी डिश वॉशचा वापर केला तर कारचा रंग लवकर खराब होऊ शकतो. ऑटोमॅटिक कार वॉश हा पर्याय अनेकांना कदाचित योग्य वाटत असेल; पण जेव्हा कार त्यातल्या तारेतून जाते तेव्हा कारच्या पेंटवर स्क्रॅच पडतात. हे स्क्रॅचेस खूप लहान असतात. यामुळे गाडीचा रंगही कालांतराने निस्तेज होतो. ग्लास क्लीनर काच साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रेमुळे कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गाडीची काच कमकुवत होऊन लवकर फुटते. याशिवाय ग्लास क्लीनरमुळे कारची काच पिवळी पडते. त्यामुळे या क्लीनरचा वापरही टाळला पाहिजे.
जेट वॉश काही जण पाण्याच्या पाइपच्या प्रेशरने कार धुऊन काढतात. त्यामुळे गाडीवर बसलेली धूळ लवकर निघून जाईल, असं त्यांना वाटतं. पण अशा प्रेशरमुळे कारचं नुकसान होतं. कारच्या पेंटवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे कार धुण्यासाठी जेट वॉशचा पर्याय टाळावा.