नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स देण्याबाबतच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यासाठी सध्याच्या नियमांत बदल करुन ते आणखी सोपे केले आहेत. नव्या नियमांनुसार, खासगी वाहन उत्पादन संघटना, एनजीओ, कायदेशीर खासगी कंपन्यांना मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्र चालण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर निर्धारित प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालक प्रशिक्षण केंद्र (DTC) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करू शकतील. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत बुधवारी निर्देश दिले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या नव्या सुविधेसह RTO कडून लायसन्स देण्याची प्रक्रियाही सुरूच राहील.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, ऑटो मोबाईल असोसिएशन, खासगी वाहन उत्पादक, स्वायत्त संस्था यासारख्या वैध संस्था चालक प्रशिक्षण केंद्राच्या मान्यतेसाठी अर्ज करू शकतात.
त्याशिवाय वैध संस्थांकडे केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत निर्धारित जमिनीवर आवश्यक पायाभूत सुविधा असणं संस्थांना बंधनकारक आहे. सरकारच्या नव्या निर्देशानुसार, राज्य सरकारांना मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांना मान्यता देण्याच्या तंत्रातील तरतुदींना व्यापक प्रसिद्धी द्यावी लागेल. संबंधित अधिकारी यासाठी अर्ज दिल्यानंतर त्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्राला (DTC) मान्यता देण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतील.