नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : वरून काटेरी पण आतून मऊ, गोड गरे असणारा फणस (Jackfruit) आपल्या सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात खासकरून (Maharashtra) कोकण (Konkan) भागात होणारं हे फळ कच्चं असताना भाजीसाठी आणि पिकल्यावर खाण्यासाठी वापरलं जातं. आपल्या दृष्टीने हे अगदी सर्वसामान्य फळ आहे. त्यामुळे त्याची किंमतही कमी असते. आपल्याकडे फणसाची किंमत फार तर 100-200 रुपये किलो अशी असते; पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की लंडनमध्ये (London) एका फणसाला चक्क 160 पौंड म्हणजे सुमारे 16 हजार रुपये किंमत मिळाली आहे. तिथल्या सर्वांत जुन्या अशा बरो मार्केटमध्ये (Burrow Market) एक फणस तब्बल 16 हजार रुपयांना विकला गेला आहे. बीबीसीच्या एका फोटोग्राफरनं या फणसाचा फोटो काढला असून, तो ट्विटरवरून व्हायरल झाला आहे. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर फणसाची चांगलीच चर्चा आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्येही फणसाची लागवड केली जाते. ब्राझीलमध्ये फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. बांगलादेश आणि श्रीलंकेचं तर हे राष्ट्रीय फळ आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कारण ब्राझीलच्या अनेक भागात फणस फक्त 82 रुपये किलो दरानं विकला जातो. हा फोटो बघून ब्राझीलमध्ये अनेकांनी आता फणस विकून आपण कोट्यधीश होणार अशी कमेंट केली आहे. काही ठिकाणी फणस रस्त्यावरही टाकलेले दिसतात. इतरही काही देशांमध्ये फणस मोठ्या प्रमाणात पिकतात; मात्र योग्य पुरवठा साखळी नसल्यानं जवळपास 70 टक्के फणस वाया जातात. आपल्या देशात कोकणासह झारखंडमध्येदेखील (Jharkhand) फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. उन्हाळ्यात फणसाचा हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीला शहरी बाजारपेठेत 70 ते 80 रुपये किलो दराने, तर ग्रामीण बाजारपेठेत 40 ते 50 रुपये किलो दराने फणसांची विक्री होते. अलीकडच्या काही वर्षांत, स्थानिक बाजारपेठेत, तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत असल्यानं झारखंडमधले फणस देशातल्या अनेक राज्यांमध्ये आणि परदेशातही पाठवले जात आहेत; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फणस पाठवणं तसं जिकिरीचं ठरतं. कारण हे हंगामी फळ असून त्याचा आकारही खूप मोठा असतो. एका फणसाचं वजन 40 किलोपर्यंत असू शकतं. त्यामुळे त्याचं पॅकिंग आणि वाहतूक कठीण होते. याचं शेल्फ लाइफही अगदी कमी असतं. त्यामुळं फणसाचा व्यापार करणं जोखमीचं असतं. हे ही वाचा- चेक म्हणजे काय? याचे किती प्रकार आहेत? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर अलीकडच्या काळात विकसित देशांमध्ये (Developd Countries) शाकाहाराकडे (Vegiterian Food) वळणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढलं असून, प्रथिनयुक्त मांसाहाराला पर्याय म्हणून शाकाहारी पदार्थांचा वापर वाढला आहे. फणस शिजवल्यानंतर मांसासारखा दिसत असल्यानं त्याचा वापर वाढत आहे. त्याचं काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत आहे. फक्त ब्रिटनमध्ये (Britain) शाकाहारी व्यक्तींची संख्या जवळपास 3.5 दशलक्ष असून, ती दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून फणसाचा व्यवसायही वेगानं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 2026 पर्यंत फणसाची बाजारपेठ 359.1 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. 2021-2026 पर्यंत फणस मार्केट (Jackfruit Market) 3.3 टक्के दराने वाढेल, असा अंदाज कन्सल्टन्सी इंडस्ट्री एआरसीने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.