नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 14 फेब्रुवारी : नवनवीन प्रयोग करण्याची आवड आणि शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरू शकते हे सिद्ध करून दाखवलंय जालना जिल्ह्यातील राणीउंचेगाव येथील शेतकरी नासेर शेख यांनी. पपई लागवडीतून त्यांनी चांगला आर्थिक फायदा मिळवला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी दोन एकर पपईच्या बागेतून लाखों रुपयांचे उत्पादन घेतले आहे. किती आला खर्च? राणीउंचेगाव येथील नासेर शेख यांना 15 एकर जमीन असून, पारंपरिक पिकाचे उत्पादन व त्यासाठी येणारा उत्पादन खर्च यांचा अनेक दिवस ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी 15 फेब्रुवारी 2022 रोजी दोन एकर जमिनीवर 8 बाय 6 अंतरावर 2 हजार पपई रोपाची लागवड केली. त्याला मलचिंगवर करून पाणी व्यवस्थापन, अंतरमशागत, विविध प्रकारचे रोग पिके नियंत्रण, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन या सर्व बाबी नियोजनबद्ध पद्धतीने केल्या एकूण शेती मशागतीसाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला.
लागवडीच्या केवळ 9 महिन्यांच्या कालावधीनंतर पपईची फळे तोडणीसाठी परिपक्व झाली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी फळ खरेदी केली. 2 फेब्रुवारीपर्यंत 32 टन माल विक्री झाला आहे. 13 रुपयांपासून ते 18 रुपयांपर्यंत पपईला बाजारभाव मिळाला आहे. झाडावर अद्याप 35 टनांपर्यंत माल असून तीन महिन्यांपर्यंत त्याची टप्प्याटप्याने विक्री होणार आहे. आतापर्यंत 4 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले असून यापुढे 3 लाख रुपये उत्पादन होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. सेंद्रिय खतांमुळे पपईला मागणी शेख नासेर यांनी शेतातील फळबागांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. यामुळे त्यांच्या फळाची गुणवत्ता चांगली आहे. यामुळे बाजारामध्ये फळांना मागणी असल्याने व्यापारी त्यांची बाग खरेदीसाठी तत्पर असतात. या पपईला मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यात मोठी मागणी आहे, असं पपई उत्पादक शेतकरी नासेर शेख सांगतात.