भोपाळ, 15 जुलै : पाऊस सुरू झाला की अनेक ठिकाणी डरॉंव डरॉंव असा बेडकांचा (frog) आवाज येणं सुरू होतं. एरवी कधीच न दिसणारे बेडुक पावसाळ्यात दिसू लागतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टुणटुण उड्या मारणारे हे बेडुक पाहताना मजादेखील येते. आतापर्यंत तुम्ही सामान्यपणे हिरव्या किंवा करड्या रंगाचे बेडुक पाहिले आहेत. मात्र पिवळ्या रंगाचे बेडुक (yellow frog) कधी पाहिलेत का? पिवळे बेडुक तुम्ही पाहिले नसतील तर आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्हाला पिवळे बेडुक दिसतील. एक-दोन नव्हे तर तुम्हाला कितीतरी पिवळे बेडुक पावसाचा पुरेपूर आनंद घेताना, पावसात आवाज करत उड्या मारताना दिसतील. इंडियन फॉरेस्ट अधिकारी परवीन कसवान यांनी या पिवळ्या बेडकांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील ही दृश्यं आहेत. हे इंडियन बुलफ्रॉग आहेत असं कसवान यांनी ट्वीटमध्ये सांगितलं. . मान्सूनमध्ये ते प्रजननच्या काळात मादी बेडकाला आकर्षित करण्यासाठी आपला रंग बदलतात अशी माहितीदेखील कसवान यांनी दिली आहे.
या व्हिडीओमध्ये पाण्यामध्ये दूरून दिसणारे हे बेडुक जवळून नेमके कसे दिसतात, हे दाखवण्यासाठी कसवान यांनी या बेडकांचा क्लोजअप शॉटदेखील टाकला आहे. त्यांनी या पिवळ्या बेडकाचा फोटोदेखील शेअर केला आहे. हे वाचा - अरे देवा! आता विमानात पडायला लागला ‘पाऊस’, छत्री घेऊन बसले प्रवासी दरम्यान हिरव्या रंगाच्या बेडकांऐवजी ही पिवळे बेडुक दिसू लागल्याने नागरिक भयभीत झालेत. आधीच लोक कोरोनाच्या दहशतीत आहे, शिवाय अनेक ठिकाणी टोळधाडीचंही संकट आहे. या दुहेरी संकटात आता असे पिवळी बेडुक म्हणजे हे कोरोना किंवा टोळधाडीशी संबंधित आहे की नवं संकट आहे, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली.
दरम्यान या पिवळ्या बेडकांचा कोरोना किंवा टोळ यांच्याशी काहीही संबंध नाही, असंदेखील कसवान यांनी स्पष्ट केलं.