नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : कल्पना करा की तुम्ही एका व्यक्तीवर खूप प्रेम करत आहात आणि त्याच व्यक्तीशी तुमचं लग्न (Love Marriage) झालं आहे. पण लग्नानंतर लगेचच त्या व्यक्तीचं धक्कादायक सत्य तुमच्या समोर आलं तर तुमचं काय होईल? असंच काहीसं घडलं एका महिलेसोबत जिने तिची कहाणी (Weird Love Story) सोशल मीडियावर शेअर केली. महिलेनं सांगितलं की, 5 वर्षे एका पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मी त्याच्याशी लग्न केलं, पण हनीमूनला मला त्या व्यक्तीचं असं सत्य कळलं, जे जाणून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी त्याला लगेच घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, महिलेनं सांगितलं की, ‘मी आणि माझ्या जोडीदाराने 5 वर्षे एकत्र राहिल्यानंतर एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. लग्नाआधी लोक खूप नर्व्हस असतात, तसाच माझा पार्टनरही खूप घाबरला होता. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्याला नोकरी मिळाली. तो एका लॉ फर्ममध्ये काम करू लागला. त्याला नोकरी मिळाल्याच्या आनंदात मी त्याच्यासाठी पार्टी ठेवली, पण पार्टीत मला दिसलं की त्याचं लक्ष दुसरीकडेच होतं आणि हीच आमच्या ब्रेकअपची सुरुवात होती.
महिलेने सांगितलं की, ‘लग्न जसजसं जवळ येऊ लागलं, तसतसा तिचा जोडीदार त्याच्या कामात व्यस्त होऊ लागला. तो रात्रंदिवस आपल्या ऑफिसच्या कामात व्यस्त होता. लग्नाच्या तयारीत व्यग्र असल्याने मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. माझ्या जोडीदाराला फक्त वीकेंडलाच वेळ मिळायचा आणि त्या काळात आम्ही लग्नाच्या खरेदीसाठी जायचो. सर्व काही ठीक चाललं होते आणि लवकरच आमच्या लग्नाचा दिवस आला. मी माझ्या लग्नाबद्दल खूप आनंदी होते पण माझा जोडीदार थोडा नाराज दिसत होता. मी त्याला कारण विचारलं असता, कामाबद्दलच्या टेन्शनमुळे नाराज असल्याचं त्याने सांगितलं आणि मीदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला. विचार केला की लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर त्याचा मूड ठीक होईल.’ महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘लग्नानंतर आम्ही हनीमूनसाठी बाली येथे जाण्याचा प्लॅन (Honeymoon Plan) केला. हनिमूनलाही त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. जो माणूस मला सजताना पाहूनही आनंदी व्हायचा, आज त्याच्या चेहऱ्यावर फक्त दुःख होतं. मी त्याला इतकं नाराज आधी कधीही पाहिलं नव्हतं. महिलेनं सांगितलं की, तिचा पार्टनर हनिमूनला हॉटेलच्या बाहेरही गेला नाही आणि आम्ही दोघंही दिवसभर हॉटेलच्या रूममध्येच राहायचो. यादरम्यान आमच्यात कोणतेही शारीरिक संबंधही नव्हते, त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं.’
महिला म्हणाली, ‘यानंतर मी त्याच्या दुःखाचं कारण शोधू लागले. मला वाटलं की असं काहीतरी आहे जे तो माझ्यासोबत शेअर करत नाही. सत्य जाणून घेण्यासाठी मी तो झोपल्यानंतर त्याचा फोन तपासला, पण मला त्याच्या फोनमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही. इतक्यात त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा मेल आला, जो मी चुकून उघडला. तो मेल ओपन केल्यावर मला धक्का बसला. हा एक रोमँटिक मेल होता, ज्यामध्ये महिलेनं लिहिले होते की ती त्याला खूप मिस करत आहे (Extramarital Affair). महिलेनं पुढे सांगितलं की, ‘हा मेल वाचल्यानंतर मी त्याचा ईमेल उघडला ज्यामध्ये मला त्या महिलेचे आणखी अनेक मेल सापडले. महिलेचा मेल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, ज्या व्यक्तीसोबत मी गेली ५ वर्षे होते तोच माझी फसवणूक करत आहे. महिलेनं सांगितलं की, सत्य समोर आल्यानंतर माझं मन तुटलं आणि मी तातडीने मुंबईसाठी फ्लाइट बुक केली. यानंतर मी त्याला सांगितलं की मला त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल सर्व काही कळालं आहे. महिलेनं सांगितलं की यानंतर माझ्या पार्टनरने माझी माझी मागितली मात्र मी सांगितलं की आता मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि आता मी त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.’