नवी दिल्ली, 8 मे : इंटरनेट हे सर्व प्रकारच्या मनोरंजक आणि अद्वितीय सामग्रीचं भांडार आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपल्याला बरेच मनोरंजक व्हिडिओ सापडतात. इंटरनेटवर कधी काय नवीन पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही. अलीकडेच अशाच एका विचित्र व्हिडिओने इंटरनेट युजर्सचं लक्ष वेधून घेतलंय. व्हिडिओचा विषय खूप विचित्र आहे. यात राजेशाही शिष्टाचारांनुसार आणि राणीप्रमाणे केळं कसं खायचं हे दाखवलं आहे. रॉयल मॅनर्स तज्ज्ञ विल्यम हॅन्सन यांनी व्हिडिओमध्ये हे दाखवलंय. इंग्लंडची राणी काटा आणि चाकूने केळी कशी खाते हे त्यांनी दाखवलंय. हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. अलीकडे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, राणीप्रमाणे केळी कशी खावी. क्लिपमध्ये, हॅन्सन राजेशाही शिष्टाचारानुसार काटा आणि चाकूने केळी कशी खायची ते दाखवत आहेत. प्रथम, ते केळं पकडण्यासाठी काटा वापरतात आणि चाकूने दोन्ही टोकं कापतात. नंतर, ते केळीला आडवं कापतो जेणेकरून फळाची साल निघून ते उघडतं आणि फळ आतमध्ये दिसू लागतं. आता, ते केळीचे तुकडे करतात आणि ते खाण्यासाठी फक्त काटा आणि चाकू वापरतात.
राणीच्या केळं खाण्याच्या राजेशाही शिष्टाचारांवरील व्हिडीओवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. केळी खाण्यासारख्या साध्या गोष्टीसाठी हे असामान्य शिष्टाचार निरुपयोगी असल्याचं अनेकांना वाटलं. तर काहींना असं वाटलं की, त्यांना राजघराण्याच्या जीवनातील असे आणखी व्हिडिओ पाहायला आवडतील. केळीप्रमाणेच याआधी आंबा हे फळही चर्चेत आलं होतं. अलीकडेच एक रोबोटने केळं खराब न होऊ देता त्याची साल कशी सोलायची ते शिकलं आहे.