शिमला, 23 जुलै : लग्न (Marriage) म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नव्हे तर ते दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं, असं मानलं जातं. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) मात्र एका लग्नानं दोन गावांना(Villages) कायमचं एकत्र आणलं आहे. एका लग्नामुळं दोन गावांमधील तब्बल 200 वर्षाचं जुनं वैर कायमचं मिटलं आहे (Marriage ends 200 years Rivalry in two Villages). राजेरजवाड्यांच्या काळापासून सुरू असलेल्या दोन गावांमधील वादाचा सुखद शेवट घडवण्याचे सगळं श्रेय या दोन गावांशी नातं असलेल्या चिराग ज्योती मजेटा आणि विदुषी सुंटा या दोन प्रेमी जीवांना जातं. त्यांच्या लग्नानं एक नवा इतिहास घडवला आहे. एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच ही घटना आहे. हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या शिमला (Shimla) जिल्ह्यातील रोहडू (Rohadu) तालुक्यातील करासा आणि नावर खलावान या दोन गावांमध्ये गेल्या 200 वर्षांपासूनचं जुनं वैर आहे. वडीलांचे मूळ गाव असलेल्या करासा गावातील चिराग ज्योती मजेटा यानं नावर खलावन गावाशी संबंध असलेल्या विदुषी सुंटा या आपल्या मैत्रीणीशी नुकतंच लग्न केलं आणि या लग्नानं एक इतिहास घडवला. कारसा आणि नावर खालवन या दोन गावांमध्ये गेल्या 200 वर्षांपासून सुरू असलेलं वैर यामुळं संपुष्टात आलं. 200 वर्षांपूर्वी राजे राजवाड्यांच्या काळात या खेड्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. या संघर्षात डझनभर लोकांनी आपले प्राण गमावले होते. त्यामुळे दोन्ही खेड्यांमधील लोक एकमेकांशी कोणताही संबंध ठेवत नव्हते. स्वातंत्र्यानंतरही या दोन्ही खेड्यांमधील संबंध पूर्ववत झाले नाहीत; ती किमया चिराग आणि विदुषीच्या लग्नामुळे झाली आणि ही दोन्ही गावे आपलं वैर विसरून एकत्र आली. आता या दोन्ही खेड्यांमध्ये सुसंवाद साधण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हे ही वाचा- Pregnant महिलेला नोकरीवरुन काढलं; आता द्यावं लागेल 66 लाखांचं Compensation सध्याच्या काळात लोकांना एकमेकांच्या मदतीची नितांत गरज असताना इतकं जुनं वैमनस्य विसरून ही गावं एकत्र येणं ही खरचं फार महत्त्वाची गोष्ट आहे. चिराग मजेटा आणि विदुषी सुंटा यांच्या लग्नानं हे अशक्य ते शक्य झालं याचा त्यांनाही प्रचंड आनंद झाला असून, आजूबाजूच्या खेड्यांमध्येही त्याचे खूप कौतुक होत आहे. शिमला आणि सिरमौर या दुर्गम भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, त्याचीच पुनरावृत्ती घडल्यानं सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. चिराग मजेटा उच्च न्यायालयात वकील (High Court Advocate) असून, गायक(Singer) म्हणूनही प्रसिद्ध आहे. पारंपरिक पहाडी गीतं ही त्याची खासीयत आहे. त्याची जोउटा बढाल, दूंदी आणि राजा भगत चंद आदी गाणी खूप लोकप्रिय आहेत. तर विदुषी कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून, तिनं बंगळुरू आणि चंदीगडमधील नामांकित कंपन्यांमध्ये एचआर अधिकारी (HR officer) म्हणून काम केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांचे मित्र असलेल्या या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली.