वॉशिंग्टन, 2 ऑगस्ट : जगात असे काही लोक असतात की ज्यांच्याकडे बघून इतरांना प्रेरणा मिळते. असे लोक कुठल्याही वयाचे असू शकतात. अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत (Old Person). काही वृद्ध व्यक्ती तर इतक्या सकारात्मक आणि उत्साही असतात, की तरुणांनाही लाज वाटावी. ‘वृद्धत्वी निज शैशवाचा बाणा’ बाळगणारे हे लोक मनाने नेहमीच चिरतरुण असतात. कितीही वय झालं तरी ते थकत नाहीत की हरत नाहीत. आयुष्यातले अनेक उन्हाळे, पावसाळे बघितलेले हे लोक आपल्या जगण्यातून समाजाला प्रेरणा देत असतात. अशाच एका चिरतरुण वृद्धेची ही गोष्ट आहे. शंभरी उलटलेली ही अमेरिकेतली (USA) आजीबाई आजही चक्क मासेमारी करते. विशेष म्हणजे लॉब्स्टर (कोळंबी) पकडण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे ती लॉब्स्टर लेडी (Lobster Lady) म्हणून सर्वत्र ओळखली जाते. या लॉब्स्टर लेडीचं नाव आहे व्हर्जिनिया ऑलिव्हर (Virginia Oliver). दैनिक भास्क रने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमेरिकेतल्या माईनेमधल्या रॉकलँड इथं राहणाऱ्या ऑलिव्हरचा जन्म 1920 साली झाला. तेव्हापासून ती याच ठिकाणी राहत असून, ही लॉब्स्टर लेडी यंदा 101 वर्षांची झाली आहे. तरीही आजही ती आपली बोट घेऊन समुद्रात मासेमारी करते. ती जगातली सर्वांत वृद्ध परवानाधारक मासेमारी (Fishing) करणारी महिला आहे. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षापासून व्हर्जिनिया ऑलिव्हर मासेमारीचं काम करत असून आजही हवामान चांगलं असेल तर ती बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघते. त्यासाठी ती पहाटे साडेतीनला उठते आणि सगळी तयारी करून पाच वाजता तिची बोट समुद्रात उतरायला सज्ज असते. ऑलिव्हरचा मुलगा मॅक्स तिला या कामात मदत करतो. हे ही वाचा- डिलिव्हरी बॉयनेच केली महिलेची Delivery; थ्री इडियट्सच्या Ranchoची आली आठवण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करत राहण्याची तिची इच्छा आहे. तिचा उत्साह, जिद्द वाखाणण्याजोगी आहे. या वयातही कामाप्रति असलेली निष्ठा, आवड सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. तिचा मुलगा मॅक्स सांगतो, की ती कधीही काम करायला नाही म्हणत नाही. सतत काम करण्यासाठी तयार असते. या लॉब्स्टर लेडीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर आणि अभिमान आहे. ऑलिव्हर आणि मॅक्स या मायलेकांनी पकडलेल्या लॉब्स्टर्सना घाऊक स्तरावर चांगली किंमत मिळावी यासाठी स्प्रूस हेड लॉबस्टर पाउंड को-ऑपरेटिव्ह टीम नेहमी सज्ज असते. वयाच्या सातव्या वर्षापासून हे काम करणाऱ्या ऑलिव्हरला आज या वयात हे काम करण्याचा कंटाळा कसा येत नाही किंवा आता या वयात हे काम करण्याची काय गरज आहे, असे प्रश्न तिला नेहमी विचारले जातात. त्यावर तिचं उत्तर असतं की, हे काम सोडून देण्याचा ती विचारही करत नाही. मरेपर्यंत तिला हे काम करायचं आहे. कारण व्हीलचेअर वापरायला तिला कधीच आवडणार नाही. या लॉब्स्टर लेडीची ही विजिगीषू खरंच सर्वांना नवी उमेद देणारी आहे. सध्याच्या काळात तर तिची ही सकारात्मक वृत्ती जगण्याला बळ देणारी आहे.