नवी दिल्ली, 5 ऑगस्ट: सोशल मीडिया स्टार (Social Media Star) होण्याचा अनुभव सध्याच्या काळात अनेकांनी घेतला आहे. कोणाची तरी एखादी गोष्ट अचानक लोकांना अपील होते आणि त्यांना मोठं फॅनफॉलोइंग मिळतं आणि सोशल मीडिया स्टारचा जन्म होतो. मात्र त्यांच्याकडून काही प्रमाद घडला, तर त्यांची नाचक्कीही होते. बांगलादेशातल्या (Bangladesh) हीरो आलोम नावाच्या एका सोशल मीडिया स्टारच्या बाबतीत असंच झालं आहे. शास्त्रीय गाण्यांशी छेडछाड करून ती सादर करणाऱ्या हीरो आलोमला पोलिसांनी पकडून नेलं. त्याच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली; मात्र पोलिसांनी कारवाई करताना त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोपही केला जात आहे. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हीरो आलोम (Hero Alom) या नावाने ओळखला जाणारा हा सोशल मीडिया स्टार बांगलादेशातला आहे. त्याला फेसबुकवर 20 लाख, तर यू-ट्यूब चॅनेलवर 14 लाखांहून अधिक जण फॉलो करतात. तो स्वतःला गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणवतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात पाहिले जातात. हेही वाचा - Oh no! ट्रकला वाचवता वाचवता हवेत उडत पाण्यात कोसळली क्रेन; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL त्याची गाण्याची शैली वेगळीच आहे. तो खूपच बेसूर गातो आणि अभिजात, शास्त्रीय गाण्यांशी (Classical Songs) छेडछाड करून ती सादर करतो, अशी तक्रार काही जणांनी केली. त्यानंतर पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्याला पकडून नेलं. आलोमनेच वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला शास्त्रीय गाणी गाणं बंद करायला सांगितलं आहे. तसंच तो गायक म्हणून खूप वाईट असल्याचंही पोलिसांनी त्याला सांगितल्याचं तो म्हणाला. त्याच्याकडून पोलिसांनी एका माफीनाम्यावर सह्याही करून घेतल्या. ‘पोलिसांनी मला सकाळी 6 वाजता उठवलं आणि 8 तास ताब्यात घेतलं होतं. नोबेल पुरस्कारविजेते (Tagore Songs) रवींद्रनाथ टागोर, तसंच बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काजी नजरूल इस्लाम (Kazi Nazrul Islam) यांची गाणी मी का गातो, असे प्रश्नही पोलिसांनी मला विचारले,’ असं आलोमने सांगितलं. ढाक्याचे मुख्य तपास अधिकारी हारून उर राशीद यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली. ‘त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. सध्या तरी आलोमने आपल्या व्हिडिओत परवानगीशिवाय पोलिसांची वर्दी घातल्याबद्दल, तसंच टागोर आणि नजरूल यांची गाणी गायल्याबद्दल माफी मागितली आहे. त्याने गाण्यांची पारंपरिक शैली पूर्णच बदलून टाकली. आता परत असं करणार नसल्याचं आश्वासन त्याने दिलं आहे,’ असं हारून यांनी सांगितलं. आलोमबद्दल तक्रारी आल्या असल्या, तर त्याला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अनेकांनी त्याच्या बाजूने मतप्रदर्शन केलं आहे. आलोमचं गायन खूपच वाईट असलं, तरी हा त्याच्या वैयक्तिक अधिकारांवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पत्रकार आदित्य अराफात यांनी लिहिलं, ‘मी आलोमचा चाहता नाही; मात्र त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या प्रयत्नांना मी नक्कीच विरोध करीन.’ https://www.youtube.com/watch?v=87Wwe7TCaV4&t=36s ‘तुम्ही खचू नका. तुम्ही अस्सल हीरो आहात. दुसरं कोण काय म्हणतं याकडे लक्ष देऊ नका,’ असं संजीदा खातून राखी यांनी लिहिलं आहे. मूळ गाण्यांची वाट लावून त्यांचं सादरीकरण केल्याबद्दल अनेकांनी आलोमवर प्रचंड टीकाही केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून चौकशी झाल्यावर सुटका झाल्यावर आलोमने एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्याने स्वतः कैद्याचा पोशाख घालून तुरुंगात असल्याचं दाखवलं असून, आपल्याला फाशी दिलं जाणार आहे असं तो दुःखाने सांगत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे.