vesna vulovic
मुंबई 3 नोव्हेंबर : विमान अपघातात जिवंत राहण्याची शक्यता विरळ असते. त्यातही उंचावरून पडलं, तर मृत्यू अटळ असतो. मात्र, 50 वर्षांपूर्वी घडलेल्या एका विमान अपघातात एक तरुणी जिवंत राहिली होती. त्यावेळी अनेकांना हा चमत्कार वाटला. एका अपघातग्रस्त विमानातून 33 हजार फूट उंचीवरून जमिनीवर पडूनही एक तरुणी जिवंत राहिली. ही घटना 1972मध्ये स्वीडनमध्ये घडली होती. स्वीडनच्या स्टॉकहोममधून 26 जानेवारी 1972 ला सर्बियाच्या बिलग्रेडसाठी एक विमान निघालं. जेट फ्लाईट 367 असा फ्लाइट क्रमांक होता. विमान 33 हजार फूट उंचीवर जाईपर्यंत सर्वकाही ठीक सुरु होतं. विमानात 28 प्रवासी होते. तितक्यात विमानाच्या लगेज कक्षात एक जोरदार आवाज झाला आणि विमानाचे हवेतच 3 तुकडे झाले. विमानाला आगही लागली. विमानात आवाज झाला, तेव्हा एक एअरहोस्टेस वेस्ना खाद्यपदार्थांची ट्रॉली घेऊन प्रवाशांजवळ येत होती. तितक्यात स्फोट होऊन विमानाचे तुकडे झाले आणि ते जमिनीवर पडलं. तिथे भरपूर बर्फ होता.
vesna vulovic
‘द स्टेट्समन’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार, चेकोस्लोव्हाकियाच्या श्रीबस्का कामेनिस इथं ते विमान पडलं होतं. ब्रुनो होंके या गावातल्या एका व्यक्तीला ते दिसलं. विमानाच्या आतून एक तरुणी मदत मागत असल्याचंही त्यांनी पाहिलं. दुसऱ्या महायुद्धात वैद्यकीय मदत गटाचा भाग असलेल्या ब्रुनो यांनी तत्काळ आपली कौशल्य वापरून तिला बाहेर काढलं व उपचारांसाठी रुग्णालयात नेलं. विमानातील सर्व प्रवाशांपैकी जिवंत राहिलेली ही एकमेव तरुणी होती. तिच्या पायाची हाडं मोडली होती. शरीरावर भरपूर जखमा होत्या. तिला रुग्णालयात नेल्यावर ती कोमात गेली. 10 दिवसांनंतर शुद्धीवर आल्यावर आपलं नाव वेस्ना वलोविक असल्याचं तरुणीनं सांगितलं. मात्र 33 हजार फुटांवरून पॅराशूटशिवाय पडूनही जिवंत राहिल्याबद्दल तिला व सर्व जगालाच आश्चर्य वाटलं. वेस्ना जिवंत राहिली असली, तरी तिचा कमरेखालचा भाग अपंग झाला. ती चालू शकत नव्हती. वेस्नाच्या जिवंत राहण्यामागे काय कारणं असतील, याबाबत बरंच संशोधन झालं. वेस्ना वलोविक हिला कमी रक्तदाबाचा त्रास होता. संशोधकांच्या मते, भरपूर उंचावर असताना एखादा अपघात झाल्यास रक्तदाब भरपूर वाढतो व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयक्रिया बंद पडते.